मुंबई : देशांतर्गत तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवरील मंदीची छाया आणि जागतिक भू-राजकीय परिस्थितीतील अस्वस्थता यातून सुरक्षित आश्रयस्थान म्हणून लौकिक असलेल्या सोन्यातील गुंतवणुकीकडे कल वाढताना दिसत आहे. तब्बल सात वर्षांनंतर ‘पेपर गोल्ड’ म्हणून प्रचलित असलेल्या म्युच्युअल फंडांच्या गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडात (गोल्ड ईटीएफ) सरलेल्या २०१९ सालात झालेली १६ कोटी रुपयांची गुंतवणूक याचाच प्रत्यय देणारी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिसेंबर २०१९ अखेर सध्या कार्यरत गोल्ड ईटीएफ फंडातील एकूण गंगाजळी ५,७६८ कोटी रुपयांवर गेली आहे. तर डिसेंबर २०१८ या फंडातील गुंतवणूक गंगाजळीचे प्रमाण ४,५७१ कोटी रुपये होती. म्हणजे वार्षिक स्तरावर या फंडांची गंगाजळी २६ टक्क्य़ांनी बहरली आहे, अशी ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड (अ‍ॅम्फी)’ने प्रसिद्ध केलेली ताजी आकडेवारी दर्शविते.

अमेरिका-इराण या देशांदरम्यान भडकता युद्धजन्य संघर्ष आणि चीनबरोबरच्या अमेरिकेचे व्यापारयुद्ध यांचे जगभरच्या अर्थव्यवस्थेत उमटणारे घातक पडसाद पाहता, या गुंतवणूक पर्यायातील ओघ येत्या काळात वाढताच राहील, असे विश्लेषकांचे मत आहे.

गोल्ड ईटीएफ फंडांमधून मागील सात वर्षांपासून निरंतर निर्गुतवणूक सुरू आहे. यापूर्वी २०१२ सालात या फंडांमध्ये १,८२६ कोटी रुपयांचा सकारात्मक ओघ दिसून आला होता. त्यानंतर सरलेल्या २०१९ सालात सध्या कार्यरत १४ गोल्ड ईटीएफ फंडांमध्ये नक्त १६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. २०१८ सालात या फंडातून ५१७ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. २०१७ सालात ७३० कोटी रुपये, २०१६ सालात ९४२ कोटी रुपये, २०१५ सालात ८९१ कोटी रुपये, २०१४ सालात १,६५१ कोटी रुपये, तर २०१३ सालात १,८५१ कोटी रुपये असा निर्गुतवणुकीचा क्रम राहिला आहे.

सरलेल्या २०१९ सालात सोन्याच्या उसळलेल्या किमती पाहता, तो सर्वोत्तम लाभ देणारा गुंतवणूक पर्याय ठरला आहे. यापूर्वी २०११ सालात सोन्याच्या किमती लक्षणीय झळाळल्या होत्या.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After a gap of 7 years gold etfs witness inflows in 2019 zws