प्रारंभापासून प्रथमच देशाच्या राजकीय राजधानीबाहेर होऊ घातलेल्या यंदाच्या ‘ऑटो एक्स्पो’ या वाहन प्रदर्शनानिमित्ताने आयोजकांनी गेल्या वेळी मिळालेल्या अनुभवापासून धडा घेतल्याचे कबूल केले. दोन वर्षांपूर्वीच्या प्रगती मैदानावरील प्रदर्शनात केवळ तिकीट विक्रीच नव्हे, तर प्रसाधनगृहाच्या ठिकाणची गैरसोय आम्हाला यापेक्षा अधिक मोठय़ा जागेत प्रदर्शन घेण्यास जबाबदार ठरली, असे वक्तव्य आयोजकांनी केले आहे. या ठिकाणाबाबत संघटना, आयोजन समितीत नाराजी व्यक्त केली गेली असली तरी रसिक दर्शक, वाहनप्रेमी, खरेदीदार आणि सहभागी यांचा विचार करूनच विद्यमान नोएडा प्रदर्शनाला अंतिम रूप दिले गेल्याचेही म्हटले गेले आहे.
‘सिआम’, ‘सीआयआय’ व ‘एसीएमएआय’ यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारीत होऊ घातलेल्या १२ व्या वाहन प्रदर्शनाची अखेरची वेळ नजीक येत असतानाच तिच्याबाबत माहिती देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या मुंबईतील पत्रकार परिषदेत आयोजकांनी यंदा प्रदर्शनस्थळ हलविण्यामागची कारणे स्पष्ट केली. दिल्लीबाहेर प्रथमच नोएडा येथे होणाऱ्या या प्रदर्शनाची रंगीत तालीम म्हणून प्रत्यक्ष दिल्ली ते नोएडा या मार्गावर बस चालवून यंदाच्या प्रदर्शनाची चाचपणीही घेतली गेली, असे यापूर्वीच्या प्रदर्शनादरम्यान उद्योग संघटनेचे अध्यक्ष राहिलेल्या व महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचे डॉ. पवन गोयंका यांनी सांगितले. ‘सिआम’चे विद्यमान अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनीही या वेळी ‘आयोजन समितीतील अनेक सदस्यांना नोएडा प्रदर्शनाची संकल्पना आवडली नाही; मात्र प्रदर्शनाचा आकार आणि आयोजकांसह भेटकर्त्यांचा संभाव्य उत्साह पाहता स्वतंत्र वाहन प्रदर्शनावाचून पर्याय नव्हता,’ अशी जोड डिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto expo vehicle display