दिवसाच्या प्रारंभी घेतलेली उसळी टिकवून ठेवण्यासाठी दमछाक व्हावी आणि बाजार बंद होता होता ती उणे पातळीवर यावी, असे चित्र शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात दिसून आले. या सातत्यपूर्ण घसरणीसह बाजाराचा निर्देशांक- सेन्सेक्सने गेल्या तीन महिन्यांतील सर्वात वाईट साप्ताहिक कामगिरीही नोंदविली. सरलेल्या सप्ताहात सेन्सेक्सने ६२० अंश गमावले, जी गत १३ आठवडय़ांतील सर्वात मोठी साप्ताहिक घट ठरते.
शुक्रवारी सेन्सेक्सने जरी १४ अंकांची मामुली तूट दर्शवीत २२,४०३ अंशावर विश्राम घेतला असला, तरी तब्बल १६० अंश वाढीसह २२,४७५ या दिवसातील उच्चांकावरून त्याने घेतलेली माघार ही अधिक क्लेशकारक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही हाच कित्ता गिरवीत, दिवसअखेर १.६० अंशांच्या नुकसानीसह ६,६९४.८० वर विराम घेतला. आठवडय़ाभरात निफ्टीतही १.३ टक्क्य़ांचा उतार दिसला आहे.
मेच्या मध्यावर निवडणूक निकालासारखी महत्त्वाची राजकीय घटना समीप असताना, गुंतवणूकदारांनी बाजारात सावध पवित्रा घेतला आहे, तर निर्देशांक तसेच अनेक आघाडीच्या समभागांचे मूल्य वेगाने उंचावले असताना बहुतांशांनी त्यांची विक्री करून नफा कमावण्याचे धोरण अनुसरल्याचे बाजारात स्पष्टपणे दिसत आहे. तथापि प्रमुख निर्देशांकवगळता ग्राहकोपयोगी वस्तू, धातू, माहिती-तंत्रज्ञान, वाहन, आरोग्यनिगा या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये चांगलीच वाढ दिसून आली. बीएसई मीड आणि स्मॉल कॅप निर्देशांकही वधारले. परिणामी बाजारात १३०६ या घसरलेल्या समभागांपेक्षा, १४२३ या वधारलेल्या समभागांची संख्या अधिक राहिल्याचे आढळून आले.

विदेशी गुंतवणूकदारांचे खरेदीसत्र सुरूच!
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मात्र बाजारात खरेदीसत्र सुरूच असल्याचे दिसून येते. बुधवारी त्यांनी ४५४.४८ कोटी रुपये मूल्याची समभागांची खरेदी केली. मात्र निर्देशांकाच्या वायदा (फ्युचर्स) व्यवहारात त्यांचे स्वारस्य गेले चार दिवस निरंतर घटत असल्याचे उपलब्ध आकडय़ांवरून दिसते. चार दिवसांत फ्युचर्स सौद्यात त्यांनी १८.५ अब्ज अमेरिकी डॉलरची विक्री केली आहे.