एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सुरुवात  मुसंडीसह करणारा मुंबई शेअर बाजार दिवसअखेर २०,५००च्या खाली येत सप्ताहाच्या नीचांक पातळीवर आला. इन्फोसिसपाठोपाठ टीसीएसच्या निकालाच्या जोरावर वघारलेल्या एकूणच माहिती तंत्रज्ञान समभागांची वरच्या भावावर विक्री करून नफावसुली अनुसरली गेल्याने सेन्सेक्समध्ये दिवसअखेर १३२.११ अंश घसरण होत २०,४१५.५१ पर्यंत खाली आला. दिवसातील त्याची ही घसरण महिन्यातील सर्वात मोठी ठरली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४३.२० अंश घसरणीसह ६,०४५.८५ वर येऊन ठेपला.
चालू सप्ताहाच्या सुरुवातीला सलग पाचव्या सत्रात वाढ राखणारा मुंबई निर्देशांक मंगळवारी काहीसा घसरला होता. त्यानंतर बुधवारी बकरी ईदनिमित्त बाजार बंद होता. गुरुवारी व्यवहाराची सुरुवात २०,५०० च्या पुढे करणारा मुंबई निर्देशांक दिवसभरात २०,६२९.८० पर्यंत पोहोचला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांच्या समभागांची नफेखोरीमुळे गुंतवणूकदारांकडून मागणी वाढली. परिणामी दिवसअखेर त्यांचे मूल्य घसरले. आयटी निर्देशांकही ३.६ टक्क्यांसह घसरणीत आघाडीवर होता. अमेरिकेतील अर्थपेच संपुष्टात येणारे सावटही यावेळी बाजारात पाहायला मिळाले. गेल्या १५ दिवसांत टीसीएस १५ टक्क्यांनी तर इन्फोसिसचा समभाग ११ टक्क्यांनी उंचावला आहे. नफेखोरीमुळेच गुरुवारी ६३.८ टक्के नफ्याचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या एचसीएल टेक्नॉलॉजिजचा समभागही दिवसअखेर ७ टक्क्यांनी घसरला. दिवसभरातील वधारणेला रिलायन्स, ओएनजीसी, भारती एअरटेल, आयटीसी समभागांचीही जोड मिळाली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ९ निर्देशांक घसरलेले राहिले. तर सेन्सेक्समधील १८ समभाग घसरले.
आंतरबँक चलन व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी एकदम ६० पैशांनी उंचावला. टक्केवारीतील ही वाढ जवळपास एक टक्क्याची राहिली. स्थानिक चलन आता ६१.२३ पर्यंत भक्कम झाले आहे. गेल्या दोन दिवसांच्या घसरणीनंतर चलनाने सकाळच्या व्यवराची सुरुवातही तेजीसहच केली होती. अमेरिकेतील कर्ज मर्यादा मुदतवाढीचा पेच संपुष्टात येत असल्याने बँक आयातदारांकडून डॉलरची मागणी नोंदविली गेली. तसेच भांडवली बाजारातील गुंतवणुकीसाठीही त्याचा हातभार लागला.