सीबीआरई – नॅसकॉमचा संयुक्त भागीदारी उपक्रम

मुंबई : स्थावर मालमत्ता सल्लासेवा संस्था सीबीआरईने नॅसकॉमशी सहकार्य करत ‘प्रॉपटेक चॅलेंज’ उपक्रम घोषित केला आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान उभारणी व विकासासाठी काम करणाऱ्या नवउद्यमींना (स्टार्ट अप्स) शोधण्याच्या हेतूने यातून संयुक्तपणे प्रयत्न केले जाणार आहेत.

स्थावर मालमत्ता क्षेत्राचे स्वरूप बदलण्याची क्षमता असलेल्या सर्जनशील, नावीन्यपूर्ण आणि क्रांतिकारी संकल्पनेच्या आधारे उभ्या राहिलेल्या उदयोन्मुख व्यवसायांना पािठबा देणे हे या भागीदारीचे एकत्रित उद्दिष्ट असल्याचे नॅसकॉमचे श्रीकांत श्रीनिवासन यांनी सांगितले. सीबीआरईच्या दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष व मुख्याधिकारी आंशुमन मॅगेझीन यांच्या मते, ९० टक्क्यांपेक्षा जास्त विकासक हे पुढील पाच वर्षांत त्यांच्या व्यवसायात वापरात येणाऱ्या तंत्रज्ञानात बदलासाठी उत्सुक आहेत.

डिजिटायझेशनमुळे विकसक आणि घरइच्छुकांमध्ये नात्यात विश्वासार्ह बंध आणला जाण्याबरोबरच, तंत्रज्ञानातून कार्यक्षमता उंचावला जावा, अशीही त्यांची इच्छा असल्याचे मॅगेझीन यांनी सांगितले. ‘प्रॉपटेक चॅलेंज’ व्यासपीठातून या गरजांची पूर्तता होणे अपेक्षित असल्याचे उभयतांनी सांगितले.

चांगली संकल्पना व जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा उद्देश तसेच उबवण उपक्रमांतर्गत इच्छित बदल करण्याइतक्या लवचीकता असणाऱ्या नवउद्यमी उपक्रमांना या व्यासपीठावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशिकांसाठी चार विभाग करण्यात आले आहेत.

रियल इस्टेट फिनटेक, शाश्वतता, चापल्य आणि कार्यक्षमता आणि भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार करण्यात आलेले – मेड फॉर इंडिया असे हे विभाग आहेत.