शेअर बाजार, मौल्यवान धातू, चलन बाजाराबाबत गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त अनुमानांपासून, ते हवामान आणि पीक-पाण्याच्या स्थितीपर्यंत नेमकी भाकीते करणारी सॉफ्टवेअर प्रणाली ‘फ्युचर पॉइंट’ या ज्योतिषशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञानाचा मिलाफ साधणाऱ्या पहिल्या नवउद्यमी कंपनीने विकसित केली आहे. मुंबईत येत्या २४ जानेवारीला हॉटेल सहारा इंटरनॅशनल, विलेपार्ले पूर्व येथे होत असलेल्या अखिल भारतीय ज्योतिष संस्था संघाच्या वतीने आयोजित परिषदेत या सॉफ्टवेअरचे अनावरण होत आहे.
मुंबईस्थित कात्यायनी ज्योतिष व फ्युचर पॉइन्टचे पाठबळ लाभलेल्या या परिषदेत देशविदेशातील बाजार विश्लेषक, दलाली पेढय़ा, उद्योजक, व्यावसायिक तसेच बेजन दारूवाला, गायत्री बी. व्ही. रमण, जय प्रकाश शर्मा, शुभेष शर्मन, शिबानी एस. कुसुल्ला यांसारख्या जगप्रसिद्ध ज्योतिषांची मोठय़ा संख्येने उपस्थिती असेल, अशी परिषदेचे आयोजक जयंत पांडे यांनी माहिती दिली. अनेक वर्षांची बाजारविषयक ऐतिहासिक माहिती संकलित करीत, तिचे ग्रहांच्या स्थितीनुरूप विश्लेषण करून शास्त्रीय सिद्धांताच्या आधारे, शेअर निर्देशांक तसेच व्यक्तिगत समभागांच्या भविष्यातील कलाचा अंदाज बांधणे शक्य असल्याचे या सॉफ्टवेअर प्रणालीचे विकासक डॉ. अरुण बन्सल यांनी सांगितले. या आधी त्यांनी विकसित केलेल्या लिओ गोल्ड, लिओ स्टार व लिओ टच या लोकप्रिय सॉफ्टवेअर प्रणालींचे हे नवे विकसित रूप असेल आणि ते सामान्य गुंतवणूकदारांना वापरण्यास व समजण्यास सोपे असेल, असे त्यांनी सांगितले.