रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि भारती एअरटेल या स्पर्धक कंपन्यांनी स्पेक्ट्रम (वायू तरंग) वापरण्याचे अधिकार संपादन करणारा सामंजस्य करार केला आहे. यानुसार, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबई परिमंडळातील ८०० मेगाहर्ट्झ वर्णपटातील एअरटेलकडील वायू तरंग वापरण्याचा जिओ अधिकार मिळणार असून, त्यासाठी तिने १,४९७ कोटी रुपयांचा मोबदला देऊ केला आहे.

या करारामुळे जिओला देशातील सर्वाधिक मोबाइल फोन वापरकत्र्यांची घनता असलेल्या दिल्ली, मुंबईसारख्या क्षेत्रात अतिरिक्त स्पेक्ट्रमचा फायदा मिळू शकणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तिचे सेवा जाळे आणखी सक्षम बनू शकेल, तर दुसरीकडे भांडवलाची प्रचंड चणचण भेडसावत असलेल्या एअरटेलला या आघाडीवर काहीसा दिलासा मिळविता येणार आहे. तथापि नियामक यंत्रणेची तसेच वैधानिक मंजुरी मिळविल्यानंतरच दोन कंपन्यांतील हा करार मार्गी लागणार आहे.

भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी गोपाल विठ्ठल यांनी जिओबरोबर झालेला हा करार म्हणजे तीन परिमंडळामधील ८०० मेगाहर्ट्झ वर्णपटातील उपयोगात नसलेल्या वायू तरंगाचे मूल्य मोकळे करून त्याचा कंपनीच्या सक्षमीकरणासाठी वापर होणार आहे. कंपनीने आखलेल्या धोरणाला अनुसरूनच हे पाऊल पडले आहे, असेही त्यांनी सांगितले.