बाजारातील संधींनुरूप गुंतवणुकीत बदल हवाच!

राज्याच्या प्रशासनाचा डोलारा हाकणाऱ्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी, दुपारी या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकदार जागराचे आयोजन करण्यात आले होते.

loksatta arthsalla event
मुंबईत मंत्रालयातील कर्मचारी वर्गासाठी बुधवारी आयोजित ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या विशेष गुंतवणूकदार साक्षरता उपक्रमांत, वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे विपणन, डिजिटल, ग्राहकानुभूती विभागाचे प्रमुख अभिजीत शहा यांनी मार्गदर्शन केले.

मंत्रालयातील ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ सत्रात मोलाचे मार्गदर्शन

मुंबई : शेअर बाजाराची वाटचाल कधीच एकमार्गी नसते. त्यामुळे सध्या दिसणारे चढ-उतार हे बाजारात कायमच असतात. तथापि जोखीम घेण्याच्या मानसिक ताकदीचा अंदाज घेत, बाजार मंदीकडे संधी म्हणून पाहणे श्रेयस्कर ठरेल. अशा संधी सदासर्वकाळ बाजार देतच असतो, त्याला प्रतिसाद देणारी सजगता व तत्परता गुंतवणूकदार म्हणून आपल्याकडे असायला हवी, असा कानमंत्र ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ सत्रात बुधवारी देण्यात आला. 

राज्याच्या प्रशासनाचा डोलारा हाकणाऱ्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी, दुपारी या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकदार जागराचे आयोजन करण्यात आले होते. आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे – आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत हा कार्यक्रम मंत्रालयात तळमजल्यावरील त्रिमूर्ती प्रांगणात पार पडला. भांडवली बाजारात वादळी चढ-उतार, महागाईचा चढता पारा आणि परिणामी व्याजाचे वाढत चाललेले दर, अशा अस्वस्थ व अस्थिर वातावरणात सुयोग्य आर्थिक नियोजनाचे मार्ग या निमित्ताने वक्त्यांकडून सांगण्यात आले. 

निवृत्तीपश्चात नियोजनाच्या मधुर फळांचा आस्वाद घेण्यासाठी दीर्घकाळात जोखीम-गुंतवणूक ताळमेळ राखत मार्गक्रमण गरजेचे आहे, असे वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी यांनी नमूद केले. अर्थात गुंतवणुकीचे हे नियोजन कमीत कमी पाच ते सात वर्षांचे असावे, त्यापेक्षा कमी कालावधीचे नसावे.

नोकरीला लागल्यापासून, निवृत्त जीवनाविषयी नियोजनाच्या दिशेने गुंतवणुकीला सुरुवात करणे आदर्शवत ठरेल, असे त्यांनी पगारदारांना उद्देशून सूचित केले. या मार्गदर्शनसत्रातील दुसरे वक्ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे विपणनप्रमुख अभिजीत शहा यांनी, खर्च व गरजा अमर्याद, परंतु उत्पन्नाचे स्रोत मर्यादित अशा बहुतांशांच्या विवंचनेवर बोट ठेवले. परंतु थेंबे थेंबे तळे साचे उक्ती चक्रवाढ लाभाच्या किमयेतून, थोडीथोडकी पण दीर्घकाळ व सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा मार्ग अर्थात म्युच्युअल फंडांतील ‘एसआयपी’मधून जीवनासाठी ठरविलेली आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतात, असे शहा यांनी सांगितले.

एसआयपी- अक्षय्य ऊर्जास्रोत

तरुण वयापासून कमीत कमी का होईना सातत्यपूर्ण व शिस्तबद्ध गुंतवणूक करीत राहिल्यास, उत्तर आयुष्यात त्यातून थोडे थोडे काढून ते हयातभर पुरू शकते, अशी किमया घडवून आणणारे ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपी’ म्हणजे अक्षय्य ऊर्जास्रोतच आहेत, असे कौस्तुभ जोशी यांनी सांगितले. ससा-कासवाच्या ऐकत आलेल्या गोष्टीत, हळुवार, संयत पण सातत्यपूर्ण असलेल्या कासवाचाच आदर्श गुंतवणूकदारांनी बाळगायला हवा, असे ते म्हणाले.

आर्थिक उद्दिष्ट साध्य करायची तर महागाई दरापेक्षा अधिक दराने परतावा आवश्यक ठरतो. केवळ पैशाची बचत करून हे शक्य नाही. तर वाचविलेला हा पैसा मालमत्ता पर्यायांमध्ये शिस्तीने, दीर्घकाळ गुंतविणे गरजेचे आहे.

अभिजीत शहा, विपणन, डिजिटल, ग्राहकानुभूती विभागाचे प्रमुख, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kaustubh joshi abhijeet shah guidance over investment to mantralaya employee zws

Next Story
सेन्सेक्सची ४४३ अंश उसळी ; वाहने, माहिती तंत्रज्ञान समभागांत तेजी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी