भारतीयांची व्यक्तिगत मालमत्ता ही तब्बल २०२ लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारी असल्याचे सांगणाऱ्या ‘काव्र्ही इंडिया वेल्थ अहवाला’चे सोमवारी अनावरण करण्यात आले. या संपत्तीपैकी निम्म्याहून अधिक हिस्सा हा वित्तीय मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचा आश्चर्यकारकरीत्या असला, तरी सोने व घर-जमिनीसारख्या मालमत्तांमध्ये भारतीयांच्या गुंतवणुकीचा टक्का वाढत असल्याचेही दिसून येते. उल्लेखनीय म्हणजे देशात घराघरांत तब्बल ६०.६१ लाख कोटी रुपये मूल्याचे सुमारे २०,४७० टन सोने दडले असल्याचेही अहवालातून पुढे येते.
भारतीयांच्या बचत-गुंतवणूक आणि संपत्ती निर्माणाच्या पद्धती व बदलत्या कलांचा वेध घेणारा काव्र्हीने सलग चौथ्या वर्षी प्रस्तुत केलेला हा चौथा अहवाल असून, गेल्या वर्षांप्रमाणेच शेअर्स, रोखे, म्युच्युअल फंड, मुदत ठेवी वगैरे वित्तीय साधने आणि घर-जमीन व सोने यासारख्या भौतिक संपत्तीमधील भारतीयांच्या गुंतवणुकीचे प्रमाण ५५:४५ असे जवळपास कायम राहिले असल्याचे तो स्पष्ट करतो. पण सोन्यातील गुंतवणूक मूल्यात वर्षभरात १०.१ टक्क्य़ांची वाढ होऊन ते २०१२ सालातील सुमारे ५५ लाख कोटींवरून, २०१३ सालात ६०,६१,१६७ कोटी रुपयांवर गेले आहे. जगभरात सर्वत्र सोन्यातील गुंतवणुकीला उतरती कळा लागली असून, ती ३.८३% घटली असताना, भारतात मात्र उलटा प्रवाह वाहताना दिसत आहे. सरकारच्या भरकस प्रयासांनंतरही या मौल्यवान धातूचा मोह कमी होत नसून वर्षभरात सोन्याच्या मागणीत ३.५७% भर पडली आहे.
भारतीयांकडील भौतिक संपत्तीत सोन्याचा वाटा सुमारे ६६ टक्के इतका असून, त्या खालोखाल स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीचे प्रमाण ३१.४३ लाख कोटी रुपये इतके आहे. राहते घर वगळता सेकंड होम्स आणि गुंतवणुकीच्या उद्देशाने खरेदी केलेल्या घरांमध्ये भारतीयांचा गुंतलेला हा पैसा आहे. यात लब्ध-प्रतिष्ठितांनी देशाबाहेर स्थावर मालमत्तेत गुंतविलेल्या पैशाचे प्रमाण १७०० कोटी रुपये इतके आहे. येत्या काळात मात्र लोकांचा सोन्याकडील ओढा घटेल, परंतु सेकंड होम्सच नव्हे तर तिसरे, चौथे घर म्हणून स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीचा टक्का वाढेल, असा काव्र्हीचा कयास आहे.
वित्तीय साधनांमध्ये गुंतलेल्या ११० लाख कोटी रुपयांपैकी शेअर्समधील थेट गुंतवणुकीचा हिस्सा २२%असा सर्वाधिक असून, त्या खालोखाल विमा पॉलिसीतील गुंतवणूक (१९%) इतका येतो. थेट शेअर्समधील गुंतवणुकीतही कंपन्यांच्या प्रवर्तकांचा हिस्सा सर्वाधिक ५१.५ टक्के, वित्तीय संस्था व संस्थांत्मक गुंतवणूकदार ३३.४ टक्के आणि सर्वात शेवटी छोटय़ा गुंतवणूकदारांचा १५ टक्के असा हिस्सा आहे. गेल्या दीड महिन्यात, विशेषत: विधानसभा निवडणूक निकालांनंतर शेअर बाजाराने घेतलेली उसळी पाहता, शेअर्समधील थेट गुंतवणुकीचा टक्का सध्याच्या २२ टक्क्य़ांवरून २८ टक्क्य़ांवर जाईल. बँकांतील बचत खात्यात व मुदत ठेवींमध्ये गुंतलेला पैसा शेअर्सकडे वळेल, असा काव्र्हीचा कयास आहे.
* २०१८ पर्यंत भारतीयांची वैयक्तिक धनसंपदा दुपटीने वाढून ४११ लाख कोटींवर जाईल.
* तीन वर्षांत स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक दुपटीने वाढून ६३ लाख कोटींवर जाईल
* मालकीचे घर नसलेली शहरात १८० लाख कुटुंबे सध्या असली तरी तीन वर्षांत ९०% घर-मालक कुटुंबे
* बँक बचत खाते व मुदत ठेवींमधील पैसा शेअर गुंतवणुकीकडे वळण्याचे कयास
चालू आर्थिक वर्षांअखेर देशाचा आर्थिक विकास दर ५ टक्क्यांच्या घरात राहणे अपेक्षित आहे, परंतु आगामी काही वर्षांत आर्थिक वृद्धीत वेग येईल. परिणामी, पुढील पाच वर्षांत भारतीयांची व्यक्तिगत संपत्ती सध्याच्या २०२ लाख कोटींच्या तुलनेत दुपटीने वाढून ४११ लाख कोटींवर जाईल.
सुनील मिश्रा, मुख्य कार्यकारी, काव्र्ही प्रायव्हेट वेल्थ
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2013 रोजी प्रकाशित
समृद्धीची रास घरोघरी..
भारतीयांची व्यक्तिगत मालमत्ता ही तब्बल २०२ लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारी असल्याचे सांगणाऱ्या ‘काव्र्ही इंडिया वेल्थ अहवाला’चे सोमवारी अनावरण करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-12-2013 at 08:51 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kavrhi india wealth report