सरलेल्या मे महिन्यात लोकसभा निवडणुकीत ‘मोदी विजया’च्या अपेक्षेने अभूतपूर्व २५ हजाराची वेस ओलांडलेल्या ‘सेन्सेक्स’मुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता मोठय़ा प्रमाणात वाढली, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक गंगाजळीनेही १० लाख कोटींचा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला. म्युच्युअल फंडांच्या या एकूण मालमत्तेत महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांचा वाटा तब्बल ४७.५ टक्के आहे.
देशातील ४४ म्युच्युअल फंडांचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था ‘अॅम्फी’ने जाहीर केलेल्या मे महिन्याअखेरची म्युच्युअल फंडांच्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूक गंगाजळीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आणि जवळपास निम्मा म्हणजे ४७.५ टक्के इतका आहे. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एनसीआर (दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसर) प्रदेशाचा वाटा १०.४ टक्के आहे. उल्लेखनीय म्हणजे देशातील ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपैकी अव्वल १० राज्यांतील गुंतवणूकदारांचे म्युच्युअल फंडातील योगदान ९० टक्के इतके भरते. यावरून ‘सेबी’चे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे सार्वत्रिकीकरण आणि या योजना मोजक्या १५ बडय़ा शहरांपल्याड नेण्याच्या प्रयत्नांचे गांभीर्य लक्षात येते.
 
‘आयटी’कडून बँकांकडे संक्रमण
म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांतील मे महिन्याअखेर असलेल्या २.२५ लाख गुंतवणूक गंगाजळीपैकी देशातील ‘सनशाइन’ उद्योगक्षेत्र गणल्या गेलेल्या सॉफ्टवेअर क्षेत्रात अवघे १०.५ टक्के म्हणजे २२,९८६ कोटी रुपये गुंतले गेल्याचे आढळून आले. निधी व्यवस्थापकांनी आपला होरा हा आयटीकडून बँकिंग क्षेत्राकडे वळविलेला दिसतो. आयटी क्षेत्रातील म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीने नऊ महिन्यांपूर्वीचा तळ गाठला असताना, मे महिन्यात या गुंतवणुकीने ४८,४१९ कोटी रुपये असा सार्वकालिक उच्चांक नोंदविलेला आढळून आला. चालू वर्षांत फेब्रुवारीमध्ये म्युच्युअल फंडाच्या सॉफ्टवेअर समभागांतील गुंतवणुकीने विक्रमी २८,७८४ कोटींचा स्तर दाखविला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढारपण मुंबईमुळेच!
आपल्या ताळेबंदात मोठी रोकड बाळगणारे उद्योग या रकमेला तात्पुरता आणि फायदेशीर निवारा म्हणून म्युच्युअल फंडांच्या अल्पमुदतीच्या (डेट फंड- लिक्विड फंड, शॉर्ट टर्म बाँड फंड) योजनांचा आधार घेतात. या बडय़ा उद्योगांचे मुख्यालय हे अर्थात आर्थिक राजधानी मुंबईत असल्याने साहजिकच येथून होणारी ही सर्व गुंतवणूक महाराष्ट्राच्या नावावर जमा होते. परिणामी म्युच्युअल फंड गुंतवणुकीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. केवळ डेट फंडातील गुंतवणुकीचा विचार केल्यास महाराष्ट्राचे त्यातील  योगदान ६० टक्के इतके आहे. शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणावर दिसणारा गुजरात मात्र म्युच्युअल फंड गुंतवणुकीत पाचव्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra leads in mutual fund investment