देशाची भक्कम आर्थिक वाढ आणि बचत व गुंतवणुकीचे उमदे प्रमाण यामुळे भारताचे पतमानांकन स्थिर ठेवण्यात येत असल्याचे ‘मूडीज्’ या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने स्पष्ट केले आहे. ‘स्टॅण्डर्ड अॅण्ड पुअर्स’ या अन्य एका आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने गेल्याच महिन्यात भारताचे पतमानांकन कमी करण्याची भीती व्यक्त केली होती.
अर्थव्यवस्थेची संथ वाढ, रखडलेल्या वित्तीय सुधारणा या पाश्र्वभूमीवर येत्या दोन वर्षांत देशाचे पतमानांकन कमी होण्याची एक-तृतियांश शक्यता अजूनही असल्याचे ‘स्टॅण्डर्ड अॅण्ड पुअर्स’ने गेल्याच महिन्यात नमूद केले होते. तत्पूर्वी एप्रिलमध्ये याच संस्थेने भारताचे पतमानांकन ‘स्थिर’वरून ‘उणे’ केले होते.
तथापि मूडीज्च्या ताज्या ‘भारताच्या पत विश्लेषण’ अहवालाने स्पष्ट केले आहे की, भक्कम राष्ट्रीय सकल राष्ट्रीय उत्पादन आणि देशांतर्गत वाढती बचत व गुंतवणूक या बाबी देशाचे ‘बीएए३’ हे पतमानांकन आणि स्थिर अंदाज यांना बळकटीच देणारे आहेत. तर देशाचा कमकुवत सामाजिक आणि भौतिक पायाभूत विकास, कमी दरडोई उत्पन्न, वाढती सरकारी तूट आणि कर्जप्रमाण हे मात्र पत आव्हानांमध्ये भर घालत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. भारताचे किचकट नियामक वातावरण आणि महागाईकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोनही चिंताजनक असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. वार्षिक तुटीचा कल हा सध्याच्या पतमानांकनानुसार सर्वाधिक असून सरकारचा सैल महसूली खर्च यामुळे वाढ खुंटते हे सिद्ध झाले आहे, याकडे अहवालाने लक्ष वेधले आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेतील सरकारचे कर्ज हे गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
भारतीयांमार्फत होणारी मोठय़ा प्रमाणातील बचत आणि पायाभूत सेवा क्षेत्राची वाढ यासारख्या सकारात्मक बाबी भारताचा विकासदर मार्च २०१३ पर्यंत ५.४ टक्क्यांपर्यंत व त्यापुढील आर्थिक वर्षांत ६ टक्क्यांपर्यंत घेऊन जातील, असा आशावादही ‘मूडीज’ने व्यक्त केला आहे.
मानांकनांचा बदलता अवकाश..
२७ नोव्हेंबर २०१२ : Moody’s मूडीज
देशांतर्गत बचत व गुंतवणुकीचा लक्षणीय दर पाहता मजबूत अर्थवृद्धी शक्य असून ‘बीएए३’ हे
मानांकन कायम
१८ जून २०१२ : फिच
देशांतर्गत वित्तीय तूट आणि चालू खात्यावरील तूट अशा भयंकर दुहेरी तुटीला पाहता मानांकन ‘स्थिर’वरून नकारात्मक!
र४ एप्रिल २०१२ : एस अॅण्ड पी
भयंकर दुहेरी तुटीबरोबरीनेच सरकारला जडलेल्या ‘धोरण लकवा’ अर्थवृद्धीला मारक ठरेल, या निष्कर्षांतून मानांकन नकारात्मक!
दुसऱ्या तिमाहीत ५.१ टक्के विकास दराचा कयास
गेल्याच आठवडय़ात ‘मूडीज’ या पतामानांकन संस्थेने उपरोक्त तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था ५.५ टक्क्यांपेक्षा किरकोळ अधिक वेगाने वाढेल, असा अंदाज व्यक्त केला होता. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हा दर ५.५ टक्के असेल, असे नुकतेच नमूद केले होते. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीचे देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादनाचे दर ३० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत. संपूर्ण चालू आर्थिक वर्षांसाठी सरकारचे उद्दीष्ट ५ ते ५.५ टक्क्यांचे आहे. देशाने पहिल्या तिमाहीत ६.५ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन साधताना नऊ वर्षांतील सर्वात कमी दर नोंदविला होता.