म्युच्युअल फंड उद्योगाने गुंतवणूकदारांकडून जमा केलेल्या एकूण गंगाजळीने सरलेल्या जानेवारी २०१४ मध्ये ९.४ टक्क्यांची वाढ दाखवून विक्रमी ९.०३ लाख कोटींचा उच्चांक गाठला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांच्या सार्वकालिक उच्चांकाबरोबरच गेल्या तीन महिन्यांत इक्विटी फंडांमध्ये गुंतवणुकीला बहर आला असला तरी, सध्याचा हा विक्रमी कळस प्रामुख्याने लिक्विड फंडातील वाढत्या ओघाचा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे.
देशभरात एकूण ४५ म्युच्युअल फंड सध्या कार्यरत असून, त्या सर्वानी जानेवारी २०१४ मध्ये ८३,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली. जी एप्रिल २०१३ नंतरची म्युच्युअल फंडांकडील सर्वाधिक मासिक आवक असल्याचे ‘क्रिसिल’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्या आधीच्या डिसेंबर २०१३ मध्ये म्युच्युअल फंडांची गंगाजळी (गुंतवणूकयोग्य मालमत्ता-एयूएम) ८.२५ लाख कोटी रु. होती, तर नोव्हेंबर २०१३ अखेर एकूण गंगाजळीने ८,८९,९५२ कोटी रुपयांचे शिखर गाठले होते.
विशेषत: लिक्विड फंडांमध्ये वाढलेल्या गुंतवणुकीच्या पाश्र्वभूमीवर केवळ जानेवारी महिन्यात ७७,५०० कोटी रुपयांची भर गंगाजळीत पडली आहे. जी गेल्या नऊ महिन्यांतील सर्वाधिक भर आहे. या फंड वर्गवारीची एकूण गंगाजळी जानेवारीत तब्बल ४३ टक्क्यांनी वाढून रु. २.५९ लाख कोटींवर पोहोचली आहे. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे आधीचे सलग दोन महिने गुंतवणुकीचे निर्गमन अनुभवणाऱ्या उत्पन्न योजना -इन्कम फंड्स, डेट फंड आणि स्थिर उत्पन्न योजना (एफएमपी) यांनी जानेवारीत नक्त ५९०० कोटी रुपयांची भर पाहिली. गेल्या महिन्यात जवळपास सहा-सात अल्पावधीत मुदतपूर्ती असलेले डेट फंड आणि स्थिर उत्पन्न योजना बाजारात आल्या होत्या, त्याचाच हा परिणाम आहे.
म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांनीही सलग तिसऱ्या महिन्यात गुंतवणुकीत वाढ अनुभवली. दिवाळीच्या तोंडावर भांडवली बाजाराबद्दलची सकारात्मकता आणि गुंतवणूकदारांच्या बदललेल्या भावनांचा म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमध्ये कैक महिन्यांनंतर लक्षणीय ओघ दिसून आला. जानेवारी महिन्यात नव्याने ४२७ कोटी रु. इक्विटी योजनांमध्ये आले, त्या आधी डिसेंबरमध्ये ८५७ कोटी रु., तर नोव्हेंबरमध्ये ६९९ कोटी रुपयांची या फंड वर्गवारीत भर पडली होती. तथापि अलीकडच्या शेअर बाजारातील मरगळीपायी इक्विटी योजनांची एकूण गंगाजळी मात्र आधीच्या महिन्याच्या तुलनेत ४ टक्क्यांनी घसरून १.७५ लाख कोटींवर जानेवारीअखेर स्थिरावली. दिवाळी आधी ऑक्टोबर महिन्यात गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेतल्याने, इक्विटी फंडातील गंगाजळीला तब्बल ३,५४२ कोटी रुपयांनी कात्री लागली होती.

तथापि, सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)’ योजनांमध्ये सलग आठव्या महिन्यात ओघ आटला असल्याचे जानेवारीमध्ये दिसून आले. गिल्ट फंडातही नवीन गुंतवणुकीपेक्षा बाहेर    पडणाऱ्या गुंतवणूकदारांचे प्रमाण अधिक दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदेशातील मालमत्तांमध्ये मात्र घसरण
म्युच्युअल फंडांची विदेशातील मालमत्ता १८.८ टक्क्यांनी कमी होत ३,१९० कोटी रुपयांवर आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांची विदेशी मालमत्ता मार्च २०१३ अखेर ३१.९ अब्ज डॉलपर्यंत घसरली आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे मार्च २०१२ अखेर ती ८९.३ अब्ज डॉलर अशी होती. सर्व ४५ फंडांची विदेशातील  गुंतवणूकही १२.३ टक्क्यांनी घसरली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutual fund assets cross rs 9 lakh crore in january