आपल्याला एक विश्वासू व्यक्ती म्हणून घडविण्यात पालकांची मुख्य भूमिका राहिली आहे. आणि आत्मविश्वासाचा हा अत्यावश्यक गुणच महिलांच्या  परिणामकारक नेतृत्वासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन मूळच्या भारतीय वंशाच्या व अमेरिकेतील दक्षिण कारोलिना प्रांताच्या गव्हर्नर निक्की रंधवा-हेली यांनी गुरुवारी मुंबईत केले.
‘भारतीय उद्योग महासंघा’तर्फे (सीआयआय) आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय महिला संपर्क’ या विषयावरील परिषदेत त्या बोलत होत्या. त्यांच्यासह राज्याच्या नवनियुक्त महिला व बालकल्याण तसेच ग्रामीण विकास व जलसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या उपस्थितीत महिला उद्योजकांसमोर या वेळी महिलांमधील नेतृत्वावर भाष्य केले गेले.
आपल्या नेतृत्वाच्या प्रवासादरम्यान पतीकडून मिळालेल्या पाठिंब्याबाबत निक्की यांनी या वेळी जाहीर आभार मानले. आपल्यासाठी कुटुंब हे सर्वप्रथम असून त्यांच्या मदतीमुळेच आपण एक उत्तम नेतृत्व करू शकतो, असेही त्या म्हणाल्या. भारतातील आपल्या लहानपणाच्या आठवणी त्यांनी या वेळी उपस्थितांसमोर जागविल्या.
विविध आव्हानांचा सामना करताना महिला म्हणून एखाद्या व्यक्तीने कसे ठामपणे उभे राहायला हवे, असेही त्यांनी सांगितले. स्वत:वरील विश्वासच आपल्याला अनेक वेळा नकारात्मकतेतून सकारात्मक निर्णयापर्यंत घेऊन आला, हे त्यांनी दक्षिण कारोलिनासाठी केलेल्या नियामक बदलाबाबत नमूद केले.
एखाद्या मोहिमेत महिला अपयशी झाल्यास त्यांना मागे खेचण्याऐवजी त्यांच्यातील खऱ्या गुणांची जाणीव करून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत या वेळी त्यांनी मांडले. तर एखाद्या स्त्रीला यशस्वी नेतृत्व करायचे असेल तर तिला कुटुंबाकडून मिळणारा पाठिंबा खूपच आवश्यक आहे, असे पंकजा यांनी या वेळी सांगितले.
केवळ स्त्री अथवा पुरुष म्हणून नेतृत्वावर भर नको तर त्या व्यक्तीमधील वैयक्तिक गुणवत्तेच्या आधारावर संबंधित व्यक्तीचा कस लागावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुरुष तसेच स्त्री यांमधील समतोल साधण्याची गरजही त्यांनी या वेळी प्रतिपादन केली. आपण अपघातानेच राजकारणात आलो अशा शब्दांत आपला राजकीय प्रवासही त्यांनी या वेळी तमाम महिला उद्योजकांपुढे कथन केला.
बहुआयामी कर्तृत्वापोटी महिला या एक उत्तम नेतृत्व ठरू शकते, असेही त्या म्हणाल्या. स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी महिलांनी कठोर परिश्रम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.