जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या व अन्य आयातीत जिनसांच्या किमती उतरल्या असल्या तरी देशात आजच्या घडीपर्यंत सरासरीपेक्षा २४ टक्के कमी झालेला पाऊस आणि त्याचे भाववाढीच्या दृष्टीने संभाव्य परिणाम पाहता रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ५ ऑगस्टच्या पतधोरण आढाव्यात व्याजाच्या दरात काही फेरबदल करणे शक्य दिसत नाही, असे मत इंडियन ओव्हरसीज बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नरेंद्र यांनी व्यक्त केले. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका विजयालक्ष्मी अय्यर यांनीही असाच सूर व्यक्त करीत तूर्तास नाही पण त्यापुढील पतधोरणात मात्र रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजाचे दर खाली आणले जाण्याची आशा व्यक्त केली. यंदाचा पाऊस २४ टक्के तुटीचा सध्या दिसत असला तरी २००९ सालच्या तुलनेत स्थिती बरी असल्याचे त्यांनी सांगितले. ताजे घाऊक तसेच किरकोळ ग्राहक किमतीवर आधारित महागाई दराचे आकडेही उत्साहवर्धक असल्याचे त्या म्हणाल्या. १० वर्षे मुदतीच्या रोख्यांवरील सध्याचा परतावा दरही नजीकच्या भविष्यात व्याजाचे दर खालावतील असे संकेत करणारा असल्याचे सांगून एम. नरेंद्र यांनी ऑक्टोबर २०१४ च्या पतधोरण व्याजदर कपात निश्चितच अपेक्षिता येईल, असे स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No cut of interest rates