मुंबईपासून दिल्लीपर्यंतच्या तेलवाहिनीच्या देखभालीसाठीची केंद्रे आता पूर्णत: सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील भारत पेट्रोलियमने घेतला आहे. सुमारे ३२ हजार किलोमीटरच्या या वाहिनीदरम्यान असणाऱ्या या देखभाल केंद्रासाठी कंपनीला होणारा डिझेलवरील खर्च तसेच त्याच्या पुरवठय़ाची अडचण यामुळे कमी होणार आहे. सरकारच्या इंधन अनुदानाचा भार सोसणाऱ्या सार्वजनिक कंपन्यांमध्ये या कंपनीचे या माध्यमातील कार्य आदर्श ठरणार आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) चेंबूर येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पातून निघणारी वाहिनी दिल्लीपर्यंत जाताना महाराष्ट्रासह सहा राज्यांतून जाते. १९९८ ते २००७ अशा तीन टप्प्यांत प्रत्यक्षात आलेल्या या वाहिनीचा पहिला देखभाल थांबा कसारानजीक आहे. मुंबई-मनमाडदरम्यानच्या १,४०० किलोमीटरच्या या वाहिनीतून इंधनाचा दिवसाला २२ हजार किलोलिटर प्रवास होतो. देखभाल, वितरण अशी विविध केंद्रे या दरम्यान आहेत.
या केंद्रांसाठी कंपनीला दिवसाला लाखो लिटर डिझेल लागते. वाहिनी जंगल, डोंगर-कपारीतून जात असल्याने तेथे इंधन पोहोचविणेही जिकिरीचे होऊन बसते. अशावेळी ही केंद्रे उपलब्ध नैसर्गिक स्त्रोताचा वापर करून चालविता येऊ शकतात, या विचाराने ती सौर ऊर्जेवर चालविण्याचे पाऊल उचलण्यात येत आहे. कंपनीचे सध्या २५ सौर ऊर्जा प्रकल्प आहेत. यात आणखी १५ प्रकल्पांची भर मार्च २०१४ पर्यंत पडणार आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य पद्धती विकास व्यवस्थापक नरसिंह गुरकोटवार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
राईचीवाडीला विनाखंड मोफत प्रकाश
ठाणे जिल्ह्यातील कसाऱ्यापासून ७ किलोमीटरवर असणाऱ्या वशाळानजीकच्या राईचीवाडी या छोटय़ाशा गावात भारत पेट्रोलियमचे मुंबई-दिल्लीदरम्यानचे पहिले देखभाल केंद्र आहे. कंपनीने येथे ४.८ केव्ही क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प १३.५० लाख रुपये खर्च करून उभारला आहे. मात्र या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ३५ घरे असलेल्या राईचीवाडीला वर्षभर मोफत पुरविण्याचे पाऊल कंपनीने उचलले आहे. सामाजिक दातृत्वापोटी घेतलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी प्रकल्पस्थळी कंपनीच्या रिफायनरी विभागाचे संचालक बी. के. दत्ता यांच्या हस्ते झाला. कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे सर व्यवस्थापक रमेश नायर, पाईपलाईन विभागाचे कार्यकारी संचालक अनुराग दीपक आदी उपस्थित होते.
पी. व्ही. पॉवर आणि स्मार्ट ट्रॅक या कंपन्यांच्या तंत्रज्ञानाची जोड असलेल्या या प्रकल्पातून दिवसाला २० ते २५ युनिट वीज उपलब्ध होते. तुलनेत राईचीवाडीचा उपयोग अवघ्या १० युनिटचाच आहे. कंपनीने प्रत्येकी ८ व्ॉटचे दोन एलईडी लाईट प्रत्येक घरात दिले आहेत, तर शाळेला १२ व रस्त्यांवर १० दिवे बसविण्यात आले आहेत. सूर्यफुलाप्रमाणे दुहेरी पद्धतीवरील या प्रकल्पामुळे ३५ टक्के अधिक वीज निर्माण होणार असून ताशी १५० किलोमीटरच्या वाऱ्यातही हा प्रकल्प तग धरू शकतो, असे या प्रकल्पाच्या प्रारंभदिनी गुरकोटवार यांनी सांगितले. या प्रकल्पाचे जनक राहिलेले गुरकोटवार हे याच दिवशी भारत पेट्रोलियममधून २५ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले.
वाशाळा परिसरात राईचीवाडीप्रमाणे पाच ते सात पाडे आहेत. अडीच हजाराच्या आतील लोकसंख्या असलेल्या येथील अनेक घरांमध्ये विद्युत पुरवठा नाही. जेथे आहे तेथे दिवसाला दहा तास भारनियमन असते. २०० किलोमीटरवरील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणापासून अवघ्या आठ किलोमीटरच्या या पाडे परिसरात पाण्याचे दुर्भिक्षही पाच ते सहा महिने असते. या भागात शाळा आणि आरोग्य सुविधादेखील तुलनेने कमी आहेत. राईचीवाडीप्रमाणे अन्य पाडय़ांनाही अशी सौर ऊर्जा मिळावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने वशाळा ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसंरपंचांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2013 रोजी प्रकाशित
तेलवाहिनी देखभाल केंद्रे लवकरच सौर ऊर्जेवर
मुंबईपासून दिल्लीपर्यंतच्या तेलवाहिनीच्या देखभालीसाठीची केंद्रे आता पूर्णत: सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील भारत पेट्रोलियमने घेतला आहे.
First published on: 03-12-2013 at 08:10 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oil distributor care center on solar energy soon