ग्लॅक्सोस्मिथक्लाइन पीएलसी या मूळ कंपनीने भारतातील विक्रीच्या तुलनेत सहाव्या क्रमांकाची तिची औषधनिर्माण उपकंपनी असलेल्या ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकलमध्ये (जीएसके फार्मा) आपला भांडवली हिस्सा तब्बल ७५ टक्क्य़ांपर्यंत वाढविण्याचे पाऊल उचलले आहे. उपकंपनीत मातृकंपनीचा सहभाग तूर्त निम्मा आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हरपाठोपाठ या दुसऱ्या युरोपियन कंपनीने भारतातील उपकंपनीत हिस्सा वाढविण्यासाठी खुला देकार दिला आहे. िहदुस्तान युनिलिव्हरने आपला भांडवली हिस्सा चालू आíथक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत ५२.४८% वरून ६७.२८% वर नेला आहे. आहे.
सेबी, रिझव्‍‌र्ह बँक व अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर फेब्रुवारीत प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होईल. गुंतवणूक सल्लागार म्हणून एचएसबीसी या खरेदीची व्यवस्थापन पाहत आहेत. या देकाराने भारतीय कंपनीचे २.०६ कोटी शेअर खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्या या आशियातील तिसरी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासारख्या देशात आपल्या व्यवसायाचा पाया अधिक मजबूत करीत आहेत.
जीएसके फार्माच्या मातृकंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅण्ड्र विट्टी हे नुकतेच भारत-भेटीवर येऊन गेले. या दरम्यान त्यांनी ८६४ कोटी रुपये खर्चाचा विस्तार कार्यक्रम जाहीर केला. या माध्यमातून कंपनी औषधी गोळ्या तयार करणारी क्षमता स्थापित करणार आहे. कारखान्याची जागा अद्याप निश्चित नसली तरी बंगळुरू व नोयडा या दोन जागामधून अंतिम निर्णय घेतला जाईल. हा कारखाना २०१७ मध्ये उत्पादनास प्रारंभ करेल. २००१-१० या दशकात कंपनीने १,०६७ कोटी रुपये खर्चून आपल्या उत्पादन क्षमतेत सतत वाढ केली आहे.
चालू आíथक वर्षांच्या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. राष्ट्रीय औषध किंमत धोरणाचा फटका अन्य औषध कंपन्यांना बसला तसा या कंपनीलाही तो बसला. कंपनीची आघाडीच्या १० पकी पाच उत्पादने या औषध धोरणाच्या कक्षेत आल्यामुळे या तिमाहीत कंपनीची विक्री ७% घटून ६२६ कोटी रुपये झाली. आघाडीच्या उत्पादनांच्या घटलेल्या विक्रीमुळे नफा क्षमता या तिमाहीत १८.३५% कमी झाली. कंपनीने यंदाच्या तिमाहीत १००.९५ कोटी रुपयांचा नफा कमविला आहे.

लंडनस्थित या कंपनीने देशातील उपकंपनीतील हिस्सा वाढीचा व्यवहार प्रती समभाग ३,१०० रुपये दराने खरेदीचा खुला देकार दिला आहे. या खरेदीसाठी लंडनस्थित कंपनी जवळजवळ एक अब्ज डॉलर खर्च करणार आहे. सध्या या कंपनीत मूळ मातृकंपनीचा वाटा ५०.७० टक्के आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना २९५२.१५ वर बंद झालेला हा शेअर सोमवारी बाजारातील व्यवहार सुरू होताच २६ टक्क्यांनी उंचावला होता. बंद होताना कंपनी समभाग मूल्य मात्र राष्ट्रीय शेअर बाजारात २९२५.६० (१८.९२%) वर बंद झाला. तर मुंबई शेअर बाजारात २९२७.४० (१८.६०%) रुपयांवर वर स्थिरावले.