पीव्हीसी पाइप्सची अग्रगण्य उत्पादक कंपनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडला ‘ग्लोबल सीएसआर एक्सलन्स अ‍ॅण्ड लीडरशिप अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या ब्ल्यू डार्ट जागतिक सीएसआर दिन उपक्रमांतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुणात्मक शिक्षणास पाठबळ व सुधार या वर्गवारीमध्ये फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमाला पुरस्कार मिळाला आहे.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज त्यांचे सामाजिक दायित्व उपक्रम मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या मदतीने पार पाडते. जगातील विविध देश आणि कंपन्यांच्या १५० नामांकनांमधून कंपनीने हा पुरस्कार पटकावला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी आणि जागतिक दर्जाचे शिक्षण दिल्याबद्दल तसेच देशाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणल्याबद्दल फिनोलेक्सला हा पुरस्कार देण्यात आला. शिक्षणाची गरज आणि महत्त्व ओळखून फिनोलेक्स इंडस्ट्रीजने २०१० मध्ये मुकुल माधव विद्यालयाची स्थापना केली. फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संचालिका रितू छाब्रिया याच मुकुल माधव फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत.