अनिल अंबानींचे मोबाइल क्षेत्रातील दुसऱ्या कंपनीच्या संपादनाचे पाऊल
एमटीएसच्या माध्यमातून मूळच्या रशियन सिस्टेमा कंपनीचा भारतीय व्यवसाय ताब्यात घेण्याच्या हालचालींनंतर रिलायन्स कम्युनिकेशन्सने आता एअरसेल खरेदी करण्याकडे पावले उचलली आहेत. रिलायन्सचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांची एमटीएस व एअरसेलला रिलायन्स कम्युनिकेशन्समध्ये विलीनीकरण करण्याची मनीषा आहे. प्रत्यक्षात हा व्यवहार झाल्यानंतर रिलायन्स कम्युनिकेशन्स ग्राहकसंख्येतील दुसऱ्या स्थानावरील व्होडाफोनलाही मागे टाकेल.
एअरसेल ही नाममुद्रा असलेल्या मॅक्सिस कम्युनिकेशन्ससह तिची भागीदार सिंद्य सिक्युरिटीज अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंटबरोबर रिलायन्स कम्युनिकेशन्स करार करत असल्याचे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. याद्वारे रिलायन्स व एअरसेलचा मोबाइल व्यवसायाचे विलिनीकरण होईल, असेही कंपनीने म्हटले आहे. एअरसेल ही ग्राहकसंख्येत देशातील पाचवी मोठी कंपनी आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून सिस्टेमा श्याम टेलिसव्‍‌र्हिसेसची एमटीएस ही नाममुद्रा ताब्यात घेण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. प्रत्यक्षात हे दोन्ही व्यवहार पूर्ण झाल्यास दोन्ही नाममुद्रा स्वतंत्र अस्तित्व कायम राखत रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या अखत्यारित येतील. रिलायन्सकडील दूरसंचार ध्वनिलहरींचा भारतातील या क्षेत्रातील सर्वाधिक हिस्सा १९.३ टक्के हिस्सा असेल. तर रिलायन्सची ग्राहकसंख्या दुपटीने वाढून २० कोटी होईल. चौथ्या स्थानावर असलेली ही कंपनी त्यामुळे व्होडाफोनलाही मागे टाकेल.