पुणेस्थित कायनेटिक समूहातील कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लिमिटेडने विजेवर चालणाऱ्या ऑटोरिक्षा वाहन निर्मितीत पाऊल ठेवले आहे. कंपनीने भारतात तयार केलेल्या ‘कायनेटिक सफर’ या ई-ऑटोरिक्षाचे अनावरण कंपनीच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया यांनी गुरुवारी केले.
‘कायनेटिक सफर’ ही पर्यावरणस्नेही, प्रदूषणमुक्त आणि परवडणाऱ्या दरातील सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय बनेल, असा दावा यावेळी करण्यात आला. भारतात सध्या असलेल्या बहुतांश ई-रिक्षा आयात केल्या जात असून त्यात चिनी उत्पादनांचा अधिक समावेश आहे. तर बजाज ऑटोचे याच प्रकारातील वाहन न्यायालयीन कज्जांत अडकले आहे.
‘कायनेटिक सफर’ला ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने मंजुरी दिली असून केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील सर्व सुरक्षा निकषांचे हे वाहन पालन करत असल्याचे फिरोदिया यांनी सांगितले.
वाहनाचा कमाल वेग ताशी २५ किलोमीटर असून चालकासह ४ प्रवाशांचा ते वाहू शकते. पर्यावरणस्नेही ‘एक्साइडच्या बॅटरी’सह हे वाहन रु. १.३८ लाखांत उपलब्ध आहे. महिन्याला ४ हजार वाहन निर्मिती क्षमता असलेल्या अहमदनगर येथील प्रकल्पात सफरची निर्मिती होत आहे.
उत्तर प्रदेशकडून २७ हजार ‘सफर’नां मागणी
उत्तर प्रदेश शासनाकडून कंपनीला पदार्पणातच सर्वात मोठी मागणी आली आहे. स्पर्धात्मक निविदा पद्धतीने ४०० कोटींहून अधिक किमतीच्या २७ हजार ‘कायनेटिक सफर’ कंपनी येत्या वर्षभरात वितरित करणार आहे. राज्य शासनाचा ई-रिक्षा हा समाजपयोगी उपक्रम असून हाताने रिक्षा चालविणाऱ्यांना मोफत ई-रिक्षा पुरविण्यात येणार आहेत. कंपनीने पहिल्या ३०० ‘कायनेटिक सफर’ राज्यात वितरित केल्या असून ही क्षमता दरमहा ३ हजार रिक्षापर्यंत वाढविण्यात येणार आहे.
)