मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत नवीन सार्वकालिक नीचांक नोंदविण्याची रुपयाची मालिका सुरूच असून, सोमवारी सलग चौथ्या सत्रात ते गडगडून प्रति डॉलर ८१.६७ अशा नीचांकपदी पोहचले. व्याजदरातील तीव्र स्वरूपातील वाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीच्या अनिश्चिततेने घेरले असून, यातून अमेरिकी डॉलरने कमावलेल्या मजबुतीने जगातील सर्वच प्रमुख चलनांचे मूल्य कैक दशकांपूर्वी मागे सोडलेल्या नीचांकपदाला गडगडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरीला देशांतर्गत भांडवली बाजारातील नकारात्मक कल आणि लक्षणीय प्रमाणात समभाग विकून विदेशी गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेऊन बाहेर नेण्याच्या सुरू असलेल्या प्रवाहाचा रुपयाच्या मूल्यावर अतिरिक्त ताण येत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.

आंतरबँक परकीय चलन बाजारात, स्थानिक चलनाने ८१.४७ पातळीवर सोमवारी व्यवहार सुरू केले. नंतर घसरण वाढतच जात ते डॉलरच्या तुलनेत ५८ पैशांच्या तोटय़ासह ८१.६७ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाले. गत सप्ताहअखेरीस शुक्रवारी, रुपया ३० पैशांनी घसरून ८१.०९ या विक्रमी नीचांकावर बंद झाला होता. रुपयाच्या घसरणीचे हे सलग चौथे सत्र असून, या दरम्यान ते अमेरिकी चलनाच्या तुलनेत १९३ पैशांनी गडगडले आहे.

सोमवारी जपानच्या येन आणि चीनच्या युआन या प्रमुख आशियाई चलनांसह ब्रिटिशी पौंडातही विक्रमी नीचांकी पातळीवर घसरण झाली. युरोपीय महासंघाचे चलन असलेले युरो दोन दशकांच्या नीचांकी ०.९६६० डॉलरवर गडगडले. युक्रेनमध्ये पुन्हा युद्ध भडकण्याच्या बळावलेल्या धोक्यांनी युरोत घसरण झाली.

पौंड ५० वर्षांच्या नीचांकी

ब्रिटनच्या सरकारने मंदीचा सामना म्हणून तब्बल ४९ अब्ज डॉलरच्या कर कपातीची व्यापक योजनेची घोषणा केल्यानंतर, शुक्रवारपासून ब्रिटिश पौंडाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५ टक्क्यांहून अधिक मूल्य गमावले आहे. सोमवारी सकाळी तर ते सार्वकालिक नीचांकी पातळीवर घसरले. लंडनमधील सकाळच्या व्यवहारात ते १.०७ डॉलरच्या पातळीवर सावरण्यापूर्वी, १९७१ मधील १.०३७३ या सर्वात नीचांकी पातळीपर्यंत गडगडले होते.

आशियाई राष्ट्रांसाठी व्याजदरापेक्षा कमकुवत चलनाचा धोका खूप मोठा आहे. या क्षेत्रातील चीन व जपान या दोन सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थांच्या चलनातील घसरणीमुळे परकीय गुंतवणूकदारांनी आशियामधून पैसे काढून घेतले, तर १९९७-९८ सारख्या आशियाई संकटाची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते.  

तैमूर बेग, मुख्य अर्थतज्ज्ञ, डीबीएस

चलनवाढीचा ताप आणि व्याज दरवाढीविरुद्ध मजबूत बचाव म्हणून जोखीमदक्ष बनलेल्या जगभरातील गुंतवणूकदारांचा डॉलरकडे ओढा वाढला आहे. जोपर्यंत चलनवाढीच्या आघाडीवर सकारात्मक दिलासा दिसून येत नाही तोपर्यंत रुपयाच्या घसरणीचा प्रवाह सुरूच राहील. 

जतीन त्रिवेदी, संशोधन विश्लेषक, एलकेपी सिक्युरिटीज

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupee plunges to all time low of 81 67 against us dollar zws
First published on: 27-09-2022 at 05:10 IST