सेन्सेक्सची ४४३ अंश उसळी ; वाहने, माहिती तंत्रज्ञान समभागांत तेजी

दिवसअखेर सेन्सेक्स ४४३.१९ अंशांच्या वाढीसह (०.८६ टक्के) ५२,२६५.७२. पातळीवर बंद झाला.

Stock Market
Stock Market

मुंबई : भांडवली बाजारातील मंदीवाले आणि तेजीवाल्यांच्या चढाओढीत गुरुवारी पुन्हा तेजीवाल्यांचा वरचष्मा राहिल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने चार शतकी उसळी घेतली. जागतिक पातळीवरील संमिश्र कल असूनही देशांतर्गत पातळीवर गुंतवणूकदारांनी कमी झालेल्या मूल्यांकनावर माहिती तंत्रज्ञान, बँकिंग आणि वाहन निर्मिती क्षेत्रातील समभागांच्या खरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांकांना बळ मिळाले.

दिवसअखेर सेन्सेक्स ४४३.१९ अंशांच्या वाढीसह (०.८६ टक्के) ५२,२६५.७२. पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ६९४.२६ अंशांची झेप घेत ५२,५१६.७९ अंशांची उच्चांकी पातळी गाठली होती. तर निफ्टीमध्ये १४३.३५ अंशांची (०.९३ टक्के) वाढ झाली आणि तो १५,५५६.६५ पातळीवर स्थिरावला.

देशाच्या पूर्वेकडील भागात नैर्ऋत्य मान्सूनची समाधानकारक प्रगती आणि जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत आलेल्या उतारामुळे देशांतर्गत पातळीवर वाहननिर्मिती कंपन्यांच्या समभागात तेजी दिसून आली. तसेच अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित निर्यात सरलेल्या मे महिन्यात ९.७९ अब्ज डॉलरवर पोहोचली असून त्यात मासिक आधारावर १३.५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आणि त्या परिणामी गेल्या काही महिन्यांपासून घसरणीचा सामना करत असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दिलासादायक वृत्त आहे, असे मत एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन विभागाचे उपाध्यक्ष जतीन त्रिवेदी यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये मारुती, मिहद्र अँड मिहद्र, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, टीसीएस, सन फार्मा, विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि हिंदूस्थान युनिलिव्हरचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, पॉवर ग्रिड आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात घसरण नोंदवली गेली.

रुपयात घसरण

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण क्रम निरंतर सुरू असून गुरुवारच्या सत्रात रुपयाने ७८.३२ रुपयांचा नवीन ऐतिहासिक तळ गाठला आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या निधीच्या निर्गमनामुळे डॉलरला अधिक बळ मिळाले आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात गुरुवारच्या सत्रात रुपयाने ७८.२८ या नीचांकी पातळीपासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस १९ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ७८.३२ या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex rises 443 points nifty ends at 15556 zws

Next Story
अभियांत्रिकी वस्तू निर्यातीत वाढ ! ; मे महिन्यात १३.५ टक्के वाढीसह ९.७९ अब्ज डॉलरवर
फोटो गॅलरी