रुपयाचे अवमूल्यन, मलूल अर्थव्यवस्थेमुळे घटलेले भारतीय कंपन्यांचे बाजार मूल्यांकन ही विदेशातील मातृकंपन्यांना भारतातील अंगिकृत कंपन्यांमधील आपला भांडवली हिस्सा वाढविण्यासाठी आकर्षक संधी ठरत असून, हिंदुस्तान युनिलीव्हर आणि ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या ब्रिटिश कंपन्यांपाठोपाठ आता जपानची सुझुकी मोटर कॉर्पोरेशनही आपला ‘मारुती-सुझुकी इंडिया’मधील हिस्सा वाढविण्यासाठी सज्ज झाली आहे.
जपानच्या सुझुकीचा सप्टेंबर २०१३ अखेर स्थितीनुसार ‘मारुती’मध्ये ५६.२ टक्के हिस्सा प्रवर्तक या नात्याने आहे. ताज्या बाजारभावानुसार या हिश्शाचे मूल्यांकन सुमारे ५४,००० कोटी रुपये इतके होते. भांडवली बाजाराच्या नियमानुसार, प्रवर्तक कंपनीला आपला हिस्सा कमाल ७५ टक्क्यांपर्यंत वाढविता येईल.
‘मारुती’कडून या संबंधाने अधिकृतपणे काहीही स्पष्ट करण्यात आले नसले, तरी या घडामोडींशी नजीकच्या संबंध असलेल्या सूत्रांनी मात्र सुझुकीचा कंपनीतील हिस्सा बळावणार असल्याच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे. याबाबत कंपनीच्या संचालक मंडळात प्राथमिक स्तरावर चर्चाही झाली असून योग्य वेळ पाहून बाजारात भाग फेरखरेदीसाठी खुल्या बोलीचा निर्णय प्रवर्तकांकडून लवकरच जाहीर केला जाणे अपेक्षित आहे. सुझुकीच्या गंगाजळीत सध्या तब्बल ६६१ अब्ज येन (सुमारे ३९,६०० कोटी रुपये) इतकी रोकड असून, भारतीय कंपनीतील भागभांडवल वाढविण्यासाठी तिचा विनियोग होऊ शकतो. सुझुकीच्या जागतिक महसुलात आणि नक्त नफ्यात ‘मारुती’चे अनुक्रमे ३०% आणि ४०% असे सरस योगदान राहिले आहे, शिवाय देशाच्या कार बाजारपेठेवर ४० टक्क्यांहून अधिक मक्तेदारी असलेल्या मारुतीच्या समभागाने गेल्या १० वर्षांत वार्षिक सरासरी २४% दराने दिलेला दमदार परतावा पाहता, सध्याचे वातावरण हिस्सा वाढीसाठी सुझूकीसाठी आकर्षकच ठरते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
‘मारुती’मधील या घडामोडींचा सुगावा लागल्याने शेअर बाजारात गुरुवारी कंपनीच्या समभागाने २.९७ टक्क्यांनी उसळी घेऊन वार्षिक उच्चांकी स्तर गाठला. दिवसअखेर ५१.३० रुपयांची (कालच्या तुलनेत) भर घालून मारुती-सुझुकी रु. १,७८०.७० वर बंद झाला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2013 रोजी प्रकाशित
हिंदुस्तान युनिलीव्हर, जीएसकेपाठोपाठ सुझुकीचाही ‘मारुती’मधील हिस्सा बळावणार!
रुपयाचे अवमूल्यन, मलूल अर्थव्यवस्थेमुळे घटलेले भारतीय कंपन्यांचे बाजार मूल्यांकन ही विदेशातील मातृकंपन्यांना भारतातील अंगिकृत कंपन्यांमधील आपला

First published on: 20-12-2013 at 08:22 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suzuki motor corporation will raise their part in maruti suzuki india