मौल्यवाध धातूच्या तयार दागिने निर्मिती क्षेत्रात अल्पावधीत लोकप्रिय ब्रॅण्ड बनलेल्या ‘तनिष्क’ने व्यवसाय विस्तारताना देशभरात लवकरच ३५ नवीन दालने सुरू करणार असल्याचे उद्दीष्ट स्पष्ट केले आहे. सध्या अस्तित्व असलेल्या देशातील मोठय़ा शहरांसोबतच नव्याने विकसित होत असलेल्या शहरांमध्येही दालने उपलब्ध होणार असल्या माहिती ‘तनिष्क’च्या किरकोळ व्यवसाय व विपणन विभागाचे उपाध्यक्ष संदीप कुहील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
‘तनिष्कच्या दागिन्यांमध्ये पारंपरिक आणि अत्याधुनिक अशा दोन्ही प्रकारचा मिलाफ असल्याने महिला ग्राहकांत हा बॅ्रण्ड विशेष लोकप्रिय झाला आहे. शुद्ध सोने आणि विश्वासार्हता यांमुळे या बॅ्रण्डला ग्राहकांकडून दिवसागणिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच गेल्या आर्थिक वर्षांत तनिष्कची १८ नवीन दालने सुरू करण्यात आली’, अशी माहिती कुहील यांनी दिली. ते म्हणाले की, २०१२-२०१३ या गेल्या आर्थिक वर्षांत तनिष्कच्या व्यवसाय विक्रीत १४.८ % वाढ नोंदली. कंपनीची विक्री गेल्या आर्थिक वर्षांच्या ८,००० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ती ८,१९९ कोटी रुपये झाली आहे. ग्राहकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे चालू आर्थिक वर्षांत ‘तनिष्क’ची ३५ नवीन दालने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शहरांमध्ये तनिष्कचे अस्तित्व आहे त्या शहरांमध्येही नवे दालन सुरू करण्यात येईल. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, अजमेर, त्रिवेंद्रम, अहमदाबाद या शहरांचा समावेश असल्याचे कुहील यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या घसरणीमुळे तनिष्कच्या व्यवहारांवर विपरित परिणाम झाला नसल्याचेही कुहील म्हणाले. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळे आणि एकूणच भारतीय लोकांमध्ये असलेले सोने धातूचे आकर्षण याचा फायदा तनिष्कला निश्चितच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लग्नसराईचे दिवस असल्याने तनिष्क उत्पादनांची काही नवीन शृंखला भारतीय बाजारपेठेत सादर करणार असून यामध्ये युरोपातील राजे-महाराजांच्या मुकुटांच्या आरेखनावर आधारित काही दागिन्यांच्या नव्या आरेखनावर काम सुरू आहे; लवकरच ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असून ‘क्राऊन कलेक्शन’ अंतर्गत ही उत्पादने असतील, असेही कुहील यांनी सांगितले.
तनिष्कचे दागिने सर्वसामान्यांच्या आवाक्यातही यावेत यासाठी कमी वजनाचे मात्र दिसायला आर्कषक असे दागिने तयार केले आहेत. या दागिन्यांची सुरुवात किमान ५,००० रुपयांपासून आहे. तरुणाईसाठी ‘मिया’ (५०० रुपयांपासून), मध्यमवर्गीय  ग्राहकांसाठी ‘गोल्ड प्लस’ (५,००० रुपयांपासून) आणि उच्चवर्गातील ग्राहकांसाठी ‘झोया’ (एक लाख रुपयांपासून पुढे) हे ब्रॅण्ड असल्याचे कुहील यांनी सांगितले. तनिष्कची देशभरात १५० दालने असून पैकी १०० हून अधिक ही फ्रँचाईजी स्वरुपात आहेत. तर उर्वरित ५० दालने कंपनीच्या मालकीची आहेत.
‘दिवाण हाऊसिंग फायनान्स’चा ४५१ कोटी नफा
मुंबई : ‘दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड’ या कंपनीने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ४५१.८५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३९.५८ टक्क्य़ांची वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात २८.७३ टक्क्य़ांची वाढ झाली असून उत्पन्न ४१४०.३६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीचे कर्जवितरण १३३५७.७३ कोटींवर, तर कर्जमंजुरी १७३३६.८५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
‘फिनोलेक्स’ला नफा
मुंबई : ‘फिनोलेक्स’ इंडस्ट्रीज या पीव्हीसी पाइप्स व फिटिंग्ज उत्पादक कंपनीने ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत ६२९.५९ कोटी रुपयांचा महसूल आणि ७९.३५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षांत कंपनीला १३६ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा नफा ८१ टक्क्य़ांनी अधिक आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी ५५ टक्के (५.५० रुपये प्रतिशेअर) लाभांशाची शिफारस केली आहे.
एलआयसी-नोमुरातर्फे ७२९ दिवसांची योजना
मुंबई : ‘एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडा’ने ७२९ दिवसांची नवीन निश्चित मुदतपूर्ती योजना बाजारात आणली आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी ९ मेपासून सुरू होऊन १४ मे २०१३ रोजी बंद होणार आहे. या योजनेत प्रवेशभार नसून लाभांश आणि वृद्धी असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. सध्याच्या आयकर नियमानुसार लाभांशाची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. वृद्धी पर्याय घेतल्यास ‘डबल इंडेक्सेशन’चा फायदा ग्राहकांना मिळू शकणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.