टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम (५१) यांचा बँकॉक शहरातील शांग्रीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये अपघाती मृत्यू अथवा खून झालेला नसून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक निदानाअंती स्पष्ट झाले आहे. स्लिम हे सदर हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये रविवारी मृतावस्थेत आढळल्यामुळे अनेक तर्क-कुतर्क लढविले जात होते. मात्र, त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्राचा दाखला थायलण्डच्या पोलिसांनी दिला असून स्लिम यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. ३० वर्षीय पत्नीसह कार्ल यांनी २४ जानेवारी रोजी या हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. समुहाच्या थायलॅण्ड उपकंपनीच्या बैठकीसाठी आलेल्या कार्ल यांनी रविवारीच ‘चेक आऊट’ही केल्याचे सांगण्यात येते. हॉटेलच्या २२ मजल्यावर त्यांचे वास्तव्य होते, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. अमेरिकेच्या जनरल मोटर्समधून (जीएम) टाटा मोटर्समध्ये २०१२ मध्ये कार्ल हे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यांच्याकडे जग्वार अ‍ॅण्ड लॅण्ड रोव्हर या ब्रॅण्डचीही जबाबदारी होती. कार्ल टाटा समुहात आल्यानंतरही जीएममधील शेव्हर्ले ब्रॅण्डच्या ऐतिहासिक सव्वा लाख तवेरा वाहने परत बोलाविण्यामुळेही ते चर्चेत होते.
नवे प्रमुख लवकरच
कार्ल स्लिम यांच्यानंतर रिक्त झालेल्या पदावरील नियुक्ती येत्या काही दिवसातच केली जाईल, असे कंपनीने सोमवारी भांडवली बाजार व्यवहारनंतर जाहिर केले. नव्या मुख्य अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बोलाविली जाणार असून नव्या व्यक्तीच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असेही हा प्रवक्ता म्हणाला.
कार्ल स्लिम यांचा धक्कादायक मृत्यू म्हणजे केवळ टाटा समुहाचीच हानी नसून एकूणच भारतीय वाहन क्षेत्राचेही नुकसान आहे. विद्यमान बिकट स्थितीत वाहन उद्योगाला सावरण्यासाठी सर्वच स्तरावर जोमाने प्रयत्न व्हायला हवे, यामध्ये त्यांचा विश्वास होता.
डी. एस. रावत, ‘असोचेम’ महासचिव.
समभागही हेलावला!
कार्ल स्लिम यांच्या निधनाच्या वृत्ताने भांडवली बाजारात कंपनीच्या समभागाचे मूल्य तब्बल ६ टक्क्य़ांनी आपटले. चार शतकी सेन्सेक्स आपटीत समभाग ३४७.८० रुपयांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारावरही त्याचे मूल्य ३४८.३५ रुपयांवर टेकले. बाजाराच्या दफ्तरी ३६५.८० अशी दमदार सुरुवात करणारा कंपनी समभाग व्यवहारात ३४५.४५ रुपयांपर्यंत खालावला.

बीएसई : रु.३४७.८०(-६.१३%)
एनएसई : रु.३४८.३५(-६.००%)