सेदानश्रेणीत स्पर्धेत नवीन भर

रोडावलेल्या विक्रीनंतर प्रवासी वाहनांवर नव्याने भर देणाऱ्या टाटा मोटर्सने कॉम्पॅक्ट सेदान श्रेणीतील नवे वाहन सज्ज केले आहे. गेल्या वर्षीच्या वाहन मेळाव्यात सादर केलेले काईट५ ही संकल्पित वाहन प्रत्यक्षात ‘टिगोर’ या नावाने येत्या महिन्यात सादर केले जाणार आहे.

सेदान श्रेणीत वाहन सादर करणाऱ्या मारुती सुझुकी (स्विफ्ट डिझायर), ह्य़ुंदाई (एक्सेंट), होंडा (अमेझ), फोर्ड (अस्पायर) , फोक्सव्ॉगन (अमिओ) या कंपन्यांच्या या गटातील वाहनांना टाटा मोटर्सची ‘टिगोर’ स्पर्धा निर्माण करेल.

टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयांक पारिख यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मात्र नव्या टीगॉरचे प्रत्यक्षातील सादरीकरण तसेच त्याची किंमत याबाबत त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. मात्र त्याची किंमत ६ ते १० लाख रुपये दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

टाटा मोटर्सने २०१६च्या सुरुवातीला नोएडा येथे झालेल्या वाहन प्रदर्शनात ही कार काईट५ या नावाने सादर केली होती. कॉम्पॅक्ट सेदान श्रेणीतील ही कार आता ‘टिगोर’या नावाने प्रत्यक्षात उपलब्ध होईल. कंपनीने काही दिवसांपूर्वीच हेक्झा हे एमपीव्ही-एसयूव्ही गटातील वाहन बाजारात आणले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाहन विक्रीत घसरण नोंदविणाऱ्या टाटा मोटर्सने प्रवासी वाहन श्रेणीत २०१९ पर्यंत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविण्याचे लक्ष्य राखले आहे.