तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या तीन महिन्यांपासून अधोरेखित केलेली सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांसाठी अनुक्रमे ३१,१००आणि ९,७५० या ‘डू ऑर डाय’ पातळ्यांची पुन्हा एकदा कसोटी लागली आहे. ऐतिहासिक उच्चांक मारून निर्देशांकांमध्ये जी घसरण सुरू झाली त्या घसरणीला ३१,१००आणि ९,७५० पातळ्यांचा आधार घेऊन निर्देशांकांनी ही घसरण थांबविली. या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडय़ात निर्देशांकांची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.

येणाऱ्या दिवसात ३१,८०० / ९,९५० ही तेजी व मंदीवाल्यांच्या अशा दोघांच्या दृष्टीने या स्तराला अनन्यसाधारण महत्त्व असून बाजाराची ‘दिशा अथवा दशा’ या स्तरावरून ठरेल.

तेजीच्या दृष्टिकोनातून निर्देशांक सातत्याने पाच दिवस ३१,८००/ ९,९५०च्या वर टिकल्यास ३२,६८६/ १०,१५० या आधीच्या उच्चांकाला गवसणी घालेल व पुढचे लक्ष्य ३३,००० / १०,३५० असेल. ही बाजाराची दिशा असेल, अन्यथा निर्देशांक सातत्याने ३१,८००/ ९,९५० च्या खाली टिकल्यास निर्देशांक पुन्हा ३१,१०० / ९,७५० चा आधार घेईल.

निर्देशांकाला ३१,१०० / ९,७५० चा स्तर टिकवण्यात अपयश आल्यास जी घसरण होईल त्यात मात्र समभागांच्या किमतीची मात्र दशा होऊन निर्देशांक ३०,८०० / ९,४५० ते ९,५५० या स्तरावर विसावेल.

शुक्रवारचा बंद भाव  :

सेन्सेक्स ३१,८१४

निफ्टी ९,९७९.७०

 

लक्षणीय समभाग

हडको लिमिटेड : रु. ८३.९०

(शुक्रवारचा बंद भाव)

हडकोचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हा रु. ८० ते ९३ आहे. ९० रुपयांच्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट  १०० रु. व दीर्घकालीन उद्दिष्ट ११५ ते १२० रुपये असेल. सध्या बाजार महत्त्वाच्या वळणिबदूवर असल्याने गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतवता २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत हा समभाग खरेदी करावा. या दीर्घकालीन गुंतवणुकीला ७४ रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

सोने किमतीचा आढावा

मागील आठवडय़ात २ सप्टेंबरच्या लेखातील ३०,२०० चे वरचे इच्छित उद्दिष्ट गाठून सोन्याच्या किमतीत नफारूपी विक्री सुरू झाली.

सद्य:स्थितीत सोन्याच्या किमतीचा पट्टा (बॅण्ड) हा रु. २८,७०० ते २९,३०० असेल. रु. २९,३०० च्या वर सोने सातत्याने टिकल्यास रु. २९,५०० व नंतर २९,८०० ते ३०,१०० ही वरची उद्दिष्टे असतील. रु. २९,३०० चा भाव टिकवण्यात सोने अपयशी ठरल्यास २९,००० ते २८,७०० पर्यंत ते खाली घसरू शकेल.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 आशीष अरिवद ठाकूर – ashishthakur1966@gmail.com

(सोन्याचे भाव ‘एमसीएक्स’वरील व्यवहारांवर आधारित)

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technical analysis about index and major stocks move for the next week