होम शॉपिंग वाहिनी असलेल्या टेलीब्रॅण्ड्सने आगामी आर्थिक वर्षांसाठी २०० कोटींची उलाढाल आणि प्रत्यक्ष विक्री केंद्रांची संख्या सध्या ११० वरून १५० वर नेण्याचे उद्दिष्ट राखले आहे, अशी माहिती या वाहिनीचे चालक असलेल्या एचबीएन इंडिया या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हितेश इसरानी यांनी दिली. कंपनीची टीव्ही वाहिनीही यापुढे कात टाकत टेलीब्रॅण्ड्सऐवजी ‘एचबीएन’ (हॉट ब्रॅण्ड्स इंडिया) असे नामाभिधान धारण करीत आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी उपयुक्त उपकरणे व उत्पादने प्रस्तुत करणाऱ्या टेलीब्रॅण्ड्स वाहिनी सध्या देशभरात ४ कोटी घरांमध्ये पाहिली जाते, असा दावा करताना इसरानी यांनी आपल्या अनोख्या उत्पादनांचा ७० टक्के ग्राहक हा पुरुष असल्याचे सांगितले. कंपनीने आजवर अनेक नावीन्यपूर्ण, अन्यत्र कुठेही उपलब्ध नसलेली दर्जेदार उत्पादने तुलनेने कमी किमतीत उपलब्ध करून सर्वतोमुखी केली आहेत. हे कंपनीचे सामथ्र्यस्थळ असून, याच कारणाने टेलीशॉपिंग क्षेत्रातील अन्य सर्व स्पर्धक कंपन्या तोटय़ात असताना, एचबीएन मार्च २०१७ पर्यंत २०० कोटी रुपयांची उलाढाल गाठेल, असे त्यांनी सांगितले.