आदरातिथ्य सेवा क्षेत्रातील केसरी टूर्सच्या व्यवस्थापकीय संचालक राहिलेल्या वीणा सुधीर पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी नव्या पर्यटन प्रवासाला मंगळवारी औपचारिक सुरुवात होत आहे. ‘वीणावर्ल्ड’ नावाने सुरू होणाऱ्या नव्या पर्यटन कंपनीच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कांदिवली येथे करणार आहेत. उत्साही वीणा यांच्या नेतृत्वाखालील नव्याने येऊ घातलेल्या कंपनीचा व्यवसाय शुभारंभ पंधरवडय़ापूर्वी होत आहे.
कंपनी येत्या दिड महिन्यात मुंबई परिसरात अशी ६ व पुण्यात एक कार्यालय सुरू करणार आहे; यासाठी ५० एजंटांची नियुक्तीही करण्यात आल्याची माहिती वीणा पाटील यांनी दिली. दादर, विलेपार्ले, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली येथे ही कार्यालये असतील. नव्याने करण्यात आलेल्या व्यवस्थापन रचनेनुसार, केसरी टूर्स ही स्वतंत्र कंपनी राहणार असून तिचे नेतृत्व वीणा यांचे बंधू शैलेश पाटील यांच्याकडे असेल. ते या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक पदावर असतील तर वडिल केसरी (भाऊ) पाटील हे पूर्वीप्रमाणेच कंपनीचे अध्यक्ष राहतील.