मोबाइलधारक संख्येत दुसऱ्या स्थानावर असलेल्या व्होडाफोनने तिची ४जी तंत्रज्ञानावरील दूरसंचार सेवा बुधवारपासून मुंबई शहरात सुरू केली. देशाच्या आर्थिक राजधानीत काहीशा उशिराने सुरू झालेल्या या सेवेचा येत्या महिन्याभरात उपनगर व परिसरात विस्तार करण्यात येणार आहे.
मुंबईत ४जी सुविधा देण्यासाठी व्होडाफोनला १८०० मेगाहर्ट्झचे बॅण्ड मिळाले आहे. मुंबई परिमंडळात कंपनीचा ग्राहकसंख्येत ३३ टक्के बाजारहिस्सा आहे. मर्यादित कालावधीकरिता कंपनी ३जी दरांच्या तुलनेत ही सुविधा देणार आहे.
शहरातील ४जीच्या शुभारंभाकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते, तर कंपनीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सूद, पश्चिम विभागाचे परिचलन संचालक भुवनेश प्रताप सिंह, मुंबई परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख इश्मित सिंह आदी उपस्थित होते.
४जी सिमद्वारे मोफत अद्ययावततेची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून कंपनीच्या विद्यमान रेड योजनाधारकांकरिता दुप्पट डेटा महिन्याभरासाठी मिळेल. एका दिवसात घरपोच ४जी सिम देण्याची सुविधाही कंपनीने देऊ केली आहे.
ब्रिटन, जर्मनी, रोमानिया, स्पेन आणि नेदरलॅण्डला भेट देणाऱ्या मुंबईकरांना २६ रुपयांच्या ४जी सिमवर आंतरराष्ट्रीय रोमिंग देण्यात येणार आहे. मुंबई परिमंडळातून ३० टक्क्य़ांपर्यंत डेटा महसूल मिळणाऱ्या व्होडाफोनने या क्षेत्रातील व्यवसाय विस्ताराकरिता ७,५०० कोटींची गुंतवणूक केली आहे.
तुंबळ स्पर्धेचे प्रांगण..
४जी तंत्रज्ञानावरील मोबाइल सेवा सर्वप्रथम सुरू करण्याचा मान स्पर्धक भारती एअरटेलकडे आहे. कंपनीची ही सुविधा सध्या देशभरातील ३०० शहरांमध्ये आहे. व्होडाफोनने मुंंबईपूर्वी ही सेवा सर्वप्रथम केरळ व नंतर कर्नाटक, कोलकाता, दिल्ली व परिसर येथे सुरू केली. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या सेवेला मर्यादित स्वरूपात (कंपनी कर्मचाऱ्यांपुरती) सुरुवात झाली आहे.