तामद्य संप्रेष्य परिग्रहीतु:
जातो मामयं विशद: प्रकामं
प्रत्यíपतन्यास इवान्तरात्मा
‘शाकुंतल’ नाटकाच्या चौथ्या अंकातील हा श्लोक आहे. शकुंतलेचा दुष्यंताशी विवाह करून दिल्यानंतर कर्तव्यपूर्तीची मुलीच्या वडिलांची भावना या श्लोकातून कालिदासाने व्यक्त केली आहे. हा श्लोक आम्हाला शाळेत असताना संस्कृतच्या लोंढेबाईंनी शिकविला; परंतु या श्लोकाची अनुभूती मुलीच्या जन्मानंतर आली. मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदा तिच्या गालावरून हात फिरविताना बाईंनी २० वर्षांपूर्वी शिकवलेला हा श्लोक आठवला. काळाच्या ओघात आपल्या मुलीसाठी करावयाची कर्तव्ये बदलली, खर्चाचे प्रकार बदलले. या कर्तव्यांमध्ये वडिलांच्या बरोबरीने आईचे योगदानही महत्त्वाचे ठरते. मुलीच्या विवाहापेक्षा किती तरी अधिक खर्च शिक्षणासाठी होऊ लागला. मुलीला परदेशी उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च व त्यासाठी करावयाची धडपड एकटय़ा आईलाच करायची असेल, तर तिचे आíथक नियोजनकसे असायला हवे हे या भागात जाणून घेऊ.
हेमांगी राजाध्यक्ष (४८) या एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या महाराष्ट्र-गोवा (बृहन्मुंबई वगळून) विभाग कार्यालयाच्या मुंबई शाखेत साहाय्यक महाव्यस्थापक (एजीएम) आहेत. त्या माहेरच्या हेमांगी नाडकर्णी. त्यांचे बालपण मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शिक्षण मुंबईत राजा शिवाजी विद्यालय व पोद्दार महाविद्यालयात झाले. त्यांनी नोकरीची सुरुवात याच बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून केली. त्यांनी सीएआयआयबी ही बँकिंग विषयातील अर्हताही प्राप्त केली आहे. विवाहापश्चात त्या १९९२ मध्ये पुण्यात राहायला आल्या. त्यांची मुलगी राही (२०) ही इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग पदवीच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असून सप्टेंबर २०१६ मध्ये तिची ‘एनर्जी सिस्टीम्स’ वा विद्युत अभियांत्रिकीशी संबंधित विषयात एमएस ही पदव्युत्तर पदवी अमेरिकेतील विद्यापीठातून घेण्याची इच्छा आहे. हेमांगी यांचे दिवंगत पती सतीश व त्यांचे भाऊ यांचा पुण्यात इंजिनीअिरग वस्तू वितरणाचा व्यवसाय होता. एसकेएफ बेअिरगसारख्या अन्य सहा कंपन्यांच्या औद्योगिक वापरासाठीच्या उत्पादनाचे ते महाराष्ट्रातील आठ जिल्ह्य़ांसाठी वितरक होते. एका जीवघेण्या आजारात रोगाचे निदान झाल्यापासून तीनच महिन्यांत सप्टेंबर २००७ मध्ये त्यांचे निधन झाले. निधनाआधी दोन वष्रे त्यांनी थ्री बीएचके सदनिका पुण्यातील भांडारकर रस्ता परिसरात घेतली होती. तोपर्यंत या सदनिकेसाठी घेतलेले २८ लाख कर्ज फेडायचे शिल्लक होते. हेमांगी राजाध्यक्ष यांचे मासिक जमाखर्च अंदाजपत्रक सोबत दिले आहे.
हेमांगी व राही यांना सल्ला:
हेमांगी राजाध्यक्ष यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्यावर त्यांना एक नियोजनाचा कच्चा आराखडा दिला. त्या मुंबईत बँकेच्या मुख्यालयात एका बठकीसाठी आल्या असतानाच्या भेटीत विस्तृत चर्चा झाली. त्यांच्या शंकासमाधानानंतर काही किरकोळ फेरबदलानंतर हे नियोजन पक्के केले. हेमांगी यांनी पतिनिधनानंतर सहा महिन्यांत घर विकले व त्याच परिसरात मुख्य रस्त्यापासून थोडेसे आतल्या बाजूला वन बीएचके घर घेतले. या व्यवहारात कर्ज व व्याज फेडून त्यांना १० लाखांचा नफा झाला. सध्याच्या घरांच्या किमती पाहता त्यांना घर विकल्याची रुखरुख होती. त्यांना हे पटवून दिले की, एखादा घेतलेला निर्णय त्या वेळेच्या परिस्थितीत योग्य असाच निर्णय असतो. बरेचदा मागाहून तो निर्णय अयोग्य होता, असे वाटते. राहीचे शिक्षण व मोठय़ा सदनिकेचे कर्ज फेडणे याचा समतोल साधताना तुम्हाला तुमच्या वडिलांनी घर विकण्याचा दिलेला सल्ला योग्यच होता. तेव्हा याविषयी शंका घेण्यास वाव नाही.
दोन वर्षांनी तुम्ही राहीच्या परदेशातील शैक्षणिक खर्चासाठी कर्ज घेणार आहात; परंतु त्याची तयारी आतापासून करायला हवी. कर्जदार राही असेल व तुम्ही सहकर्जदार असाल. एकूण शैक्षणिक खर्चापकी कर्ज व तुमच्या भविष्य निर्वाह निधी किंवा तुमच्या गुंतवणुकीतून रोखता तयार करण्याचा विचार योग्य आहे. तुमच्या मुदत ठेवी किंवा राहते घर तारण म्हणून बँकेकडे ठेवावे लागेल. मंजूर झालेले शैक्षणिक कर्ज शिक्षण पूर्ण झाल्यावर ते फेडण्याची तांत्रिकदृष्टय़ा जबाबदारी राहीची असेल.
पुढील वर्षी तुमच्या राहत्या इमारतीचा पुनर्विकास होणे अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रफळाव्यतिरिक्त तुम्ही एक अतिरिक्त खोली घेऊ इच्छिता व यासाठी अंदाजे १५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अनावश्यक गोष्टींची खरेदी केली, की आवश्यक असलेल्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. थ्री बीएचके ही तुमची मानसिक गरज आहे. तुमच्या इमारतीचा पुनर्वकिास व राहीचे शिक्षणासाठी परदेशी प्रयाण या दोन्ही गोष्टी साधारण एकाच वेळी घडतील. तुम्हाला तुमचे थ्री बीएचके घर विकावे लागेल ही रुखरुख तुम्हाला मोठे घर घेण्याच्या मोहात पाडत आहे. आíथक निर्णय भावनेने न घेता सद्य:स्थितीचे भान ठेवून घेतले तर गरज असलेल्या गोष्टींचा त्याग करावा लागणार नाही. राही शिक्षण पूर्ण झाल्यावर परदेशात असेल की पुण्यात परत येईल हे आजच सांगता येणार नाही. तुमची नोकरीची अंदाजे १० वष्रे शिल्लक असणे व अजून एखादी पदोन्नती होईल हे जरी खरे असले तरी तुम्ही एक अतिरिक्त खोली घेण्याबाबत पुनर्वचिार करावा.
तुमच्या एकूण गुंतवणुकीपकी १२.५० लाख रुपयांची गुंतवणूक समभाग समतुल्य आहे. या गुंतवणुकीने तुम्हाला गेल्या तीन-चार वर्षांत ४८ टक्के भांडवलवृद्धी दिली आहे. खरे तर तुम्ही ही रक्कम वापरून शक्य तितके कमी कर्ज घेणे श्रेयस्कर आहे; परंतु बँक कर्मचारी म्हणून मिळणारे कमी व्याजदराचे गृहकर्ज तुम्हाला घ्यायचे आहे. आपले वित्तीय ध्येय गाठण्याची परिसीमा जवळ येते तसे जास्त जोखमीच्या गुंतवणूक साधनातून बाहेर पडून कमी जोखमीच्या (स्थिर उत्पन्न) गुंतवणूक साधनांचा वापर करणे नेहमीच इष्ट असते. म्हणून समभाग व समभाग समतुल्य गुंतवणुकीतून बाहेर पडणे योग्य ठरेल. गेल्या वर्षी रुपयाचे २५ टक्क्य़ांनी अवमूल्यन झाले. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या अपेक्षित खर्चात वाढ झाली. हे टाळण्यासाठी डॉलरमध्ये परदेशात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांचा विचार करू शकता. वानगीदाखल काही डॉलरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडांची कामगिरी सोबतच्या कोष्टकात दिली आहे. ही गुंतवणूक नक्की केव्हा, किती व यापकी कोणत्या फंडात करायची यासाठी वित्तीय नियोजनकाराचा सल्ला जरुर घ्या.
तुम्ही अतिरिक्त खोली घ्यायची ठरविली, तर वैकल्पित धोरण म्हणून एक योजना येथे सुचवीत आहे. शैक्षणिक कर्जाचे ३२ लाख व अतिरिक्त खोलीसाठी घेतलेल्या गृहकर्जाचे अंदाजे १५ लाख असे ४७ लाखांचे कर्ज तुम्ही घेणार आहात व शिक्षण पूर्ण झाल्यावर राहीदेखील कमवेल. तरीसुद्धा कर्जाच्या जोखमीचे नियोजन म्हणून तुम्ही राहीच्या कर्जफेडीचा कालावधी शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन ते तीन वर्षांचा असेल. म्हणजे राहीला कर्ज मंजूर झाल्यापासून तो चार ते पाच वर्षांचा असेल. या काळात तुमची जोखीम ३० ते ३२ लाखांची असेल. म्हणून राहीचा ३५ लाखांचा पाच वष्रे मुदतीचा विमा खरेदी करणे आवश्यक आहे. यासाठी एसबीआय ई-शिल्डसाठी वार्षकि रु. ४,६३३ हप्ता असेल. तसेच १५ लाखांचे कर्ज फेडण्याची जबाबदारी तुम्ही निभावणार आहात. म्हणून तुम्ही २० लाखांचा १२ वष्रे मुदतीचा विमा खरेदी करावा. यासाठी एसबीआय ई-शिल्डसाठी वार्षकि रु. ७,०९७ हप्ता भरावा लागेल.
थोडक्यात, तुमच्या आíथक नियोजनाच्या दृष्टीने तीन गोष्टी ध्यानात घेणे आवश्यक आहे. पहिली म्हणजे, तुमचे वित्तीय ध्येय जवळ आल्यानंतर कमी जोखमीच्या गुंतवणूक साधनांचा वापर करणे. दुसरी, चलन अवमूल्यनाच्या जोखमीचे व्यवस्थापन व तिसरी- तुम्ही व राही हे कर्ज घेणार असल्याने दोघांनीही आपाआपल्या जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी मुदतीचा विमा खरेदी करणे आवश्यक आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2014 रोजी प्रकाशित
अर्थो हि कन्या..
मुलीच्या विवाहापेक्षा किती तरी अधिक खर्च शिक्षणासाठी होऊ लागला. मुलीला परदेशी उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च व त्यासाठी करावयाची धडपड एकटय़ा आईलाच करायची असेल, तर तिचे आíथक नियोजनकसे असायला हवे हे या भागात जाणून घेऊ.
First published on: 25-08-2014 at 07:24 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economic discipline