आज ज्यांचे नियोजन जाणून घेणार आहोत ते प्रकाश भंडगे (वय ३०) महाराष्ट्र शासनाच्या सेवेत वन खात्यात नोकरी करत आहेत. येत्या सहा महिन्यात त्यांचा विवाहबद्ध होण्याचा विचार आहे. त्यांना ३५ हजार वेतन मिळते. जमीन खरेदी करण्यासाठी त्यांना ४ लाख रुपये ११ टक्के वार्षिक व्याजाने कर्ज घ्यायचे नियोजन आहे. त्यांनी ‘जीवन तरंग’ ही विमा योजना खरेदी केली असून त्यांना २०१३ पर्यंत वार्षकि ४९,००० हप्ता भरावयाचा आहे. तसेच महिना ३०४५ पोस्टाच्या विम्याचा हप्ता ते भरत आहेत.
विमा विक्रेत्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. अनेकदा हातात मिळालेल्या विमा इच्छुकास त्याला हप्ता भरणे शक्य आहे त्याहून अधिक विमा हप्ता भरावयास आपण लावला नाही तर दुसरा कोणी विमा विक्रेता आपले अर्धवट राहिलेले काम पूर्ण करेल अशा हेतूने मोठय़ात मोठय़ा विमा हप्त्याची योजना विमा खरेदीदाराला विकतात. आपल्या उत्पन्नाचा विचार न करता इतका मोठा हप्ता असलेली पॉलिसी आपल्याला विकली आहे. ‘जीवन तरंग’ या पॉलिसीत ५.५ टक्के खात्रीचा परतावा मिळतो. ही आजीवन विमा संरक्षण देणारी म्हणजे ‘होल लाइफ’ प्रकारची पॉलिसी आहे. म्हणजे विमा खरेदीदाराला त्याच्या वयाच्या शंभरीपर्यंत विमा छत्र देणारी योजना आहे. वयाच्या १००व्या वर्षांपर्यंत विमाछत्र मिळते. साहजिकच १००व्या वर्षांपर्यंत विम्याचा हप्ता आधीच कापून घेतला जातो. एखाद्या विमा खरेदीदाराचा मृत्यू वयाच्या ७५व्या वर्षी झाला, तरी विमा कंपनीने वयाच्या १००व्या वर्षांपर्यंत हप्ता घेतलेला असल्याने तो विमा कंपनीचा फायदाच ठरत असतो. सबब ‘होल लाइफ’ प्रकारच्या पॉलिसी विमा खरेदीदाराच्या दृष्टीने सर्वात महाग व विमा कंपनी व विमा विक्रेत्यांच्या दृष्टीने सर्वात किफायतशीर असतात. ‘होल लाइफ’ प्रकारच्या पॉलिसी कधीही खरेदी करू नये. ही पॉलिसी बंद (सरेंडर) केल्यास भरलेल्या हप्त्यापकी २५ टक्के रक्कम परत मिळणार नाही. साहजिकच हप्ते भरणे सुरू ठेवावे. तुमच्या नियोजनात झालेली चूक दुरुस्त करता येणार नाही. या विमा पॉलिसीवर तुम्हाला कर्ज मिळू शकेल ते कर्ज जरूर घ्यावे.
सर्वप्रथम २५ लाखांची एलआयसीची ई-टर्म विमा योजना खरेदी करावी. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी काही वेळेला कर्ज घ्यावे लागते. दुसरा काही पर्याय नसतो. तेव्हा अनिवार्य असल्यास कर्ज काढावे. आपले काही बाष्कळ खर्च कमी करून लवकरात लवकर कर्ज फेडावे. पसे शिल्लक राहिल्यास ‘लोकसत्ता – कत्रे म्युच्युअल फंडा’च्या यादीतून एक लार्ज कॅप व एक मिड कॅप फंड निवडून दीर्घ काळ एसआयपी सुरू ठेवावी. आपण घेणार असलेले कर्ज फिटल्यावर आपल्या नियोजनाचा फेरआढावा घ्यावा.
shreeyachebaba@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2015 रोजी प्रकाशित
आजीवन विमा योजना नकोच!
मोठय़ात मोठय़ा विमा हप्त्याची योजना विकण्यासाठी विमा विक्रेत्यांमध्ये मोठी स्पर्धा असते.
First published on: 20-04-2015 at 07:14 IST
TOPICSनियोजनभान
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No plan for life insurance