Baba Vanga’s 2026 Prophecies: जगाला हादरवणाऱ्या आपल्या रहस्यमय आणि भाकितांमुळे प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियन अंधभविष्यवेत्ती बाबा वेंगा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ‘बाल्कन्सची नॉस्ट्रॅडॅमस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगाने आपल्या आयुष्यात अनेक धक्कादायक भाकितं केली होती. प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू असो वा जगाला गुडघे टेकायला लावणारी कोविड-१९ महामारी, वेंगांच्या भविष्यवाण्यांची छाया जगावर दिसून आली. १९९६ मध्ये त्यांचं निधन झालं असलं तरी त्यांच्या भाकितांचे गूढ आजही कायम आहे. आता तर २०२६ सालासाठीच्या काही अंगावर काटा आणणाऱ्या भविष्यवाण्या समोर आल्या आहेत. काय घडणार असल्याचा उलगडा बाबा वेंगांनी केला जाणून घेऊया…

२०२६ मध्ये काय होणार? बाबा वेंगांच्या भविष्यवाणीने संपूर्ण जग हादरलं

प्रचंड नैसर्गिक आपत्ती

वेंगांच्या भाकितानुसार येत्या वर्षी जगावर भीषण नैसर्गिक आपत्तींचा मारा होणार आहे. प्रचंड भूकंप, भडकणारे ज्वालामुखी आणि हवामानातील प्रचंड बदल, यामुळे जगभरातील कोट्यवधी लोक संकटात सापडतील. इतकेच नव्हे तर पृथ्वीच्या सुमारे ७ ते ८ टक्के भूभागावर विनाशकारी परिणाम होणार असल्याचं त्यांनी आधीच सांगितलं होतं.

तिसऱ्या महायुद्धाची सावली?

सर्वात भीतीदायक भाकीत म्हणजे तिसऱ्या महायुद्धाचं. वेंगांच्या मते २०२६ मध्ये चीन-तैवान संघर्ष पेट घेईल आणि त्याच्याशी जोडून अमेरिका व रशियाचं थेट युद्ध होईल. आज जगभरात उफाळून येणाऱ्या संघर्षांची यादी कमी नाही. रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-पॅलेस्टाईन तणाव, इराण-इस्रायल संघर्ष आणि त्यात अमेरिका-रशियामधील वाढता तणाव पाहता, या भाकिताची भीती खरी वाटू लागते.

परग्रहवासीयांचा पृथ्वीवर संपर्क

आणखी थरारक भाकीत म्हणजे परग्रहवासीयांशी संपर्क! वेंगांच्या मते, नोव्हेंबर २०२६ मध्ये एक प्रचंड अवकाशयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार आहे. शास्त्रज्ञही सध्या या शक्यतेवर गंभीरपणे संशोधन करत आहेत. हार्वर्ड विद्यापीठातील अवी लोएब यांच्यासारख्या संशोधकांनीही अवकाशातून कृत्रिम वस्तू पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा उल्लेख केला आहे. मग खरोखरच २०२६ हे मानवजातीसाठी इतिहास बदलणारं वर्ष ठरेल का?

कृत्रिम बुद्धिमत्तेचं साम्राज्य

जगात वेगाने रुजणाऱ्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) विषयी वेंगांचा इशाराही तितकाच गंभीर आहे. २०२६ पर्यंत AI माणसांवर इतकं वर्चस्व गाजवेल की मानवजातीचं अस्तित्व धोक्यात येईल. आजच बघितलं तर आरोग्य, उद्योग, शिक्षण, लष्कर सर्वच क्षेत्रात AI आपलं साम्राज्य निर्माण करत आहे.

तर आता प्रश्न एकच, २०२६ हे वर्ष मानवजातीसाठी नव्या युगाची सुरुवात ठरेल की जगाच्या अंताची चाहूल देईल? बाबा वेंगांच्या या भविष्यवाण्या वाचून जगभरात भीतीचं सावट पसरलं आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)