Diwali Padwa 2024: कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा, असे म्हणतात. यंदाचा दिवाळी पाडवा २ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते आणि व्यापाऱ्यांसाठी हा दिवस नवीन वर्षाचा प्रारंभ दिन मानला जातो. त्यामुळे पाडवा अनेक दृष्टींनी महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. पण, पाडव्याला पत्नीने आपल्या पतीचे औक्षण करण्यामागे नेमकं कारण काय? याबाबतची सविस्तर माहिती स्वानंद पुणेकरगुरुजी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बलिप्रतिपदा (पाडवा) साजरा करण्यामागचे कारण

पौराणिक कथेनुसार असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजेच्या हितासाठी दक्ष राजा म्हणून बळी राजा ओळखला जायचा. पुढे त्याने आपल्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळी राजा हा अतिशय पराक्रमी आणि दानशूर होता. मात्र, त्याला अहंकाराचा वारा लागल्याने तो अहंकारापासून दूर राहू शकला नाही. तर माणसाला एकदा का अहंकाराचा वारा लागला की, मग माणसाची अधोगती सुरू होते. बळी राजाचेसुद्धा तेच झाले आणि त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंनी वामनावतार म्हणून बटूचे रूप धारण केले आणि तो बळी राजाकडे दान मागायला गेला.

बळी राजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. ते दान घेण्याच्या निमित्ताने भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटू वेशात ते बळी राजासमोर उभे राहिले. या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळी राजाने हे दान देण्याची तयारी दाखविली, तेव्हा वामनावतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी लोक व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळी राजाने आपले डोके पुढे केले. तीन पावलांमध्ये विष्णूंनी बळी राजाकडून सर्व काही काढून घेतले. परंतु, बळी राजाच्या मनाचा उदारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू बळी राजावर प्रसन्न झाले आणि त्याला त्यांनी पाताळाचे राज्य दिले.

या संपूर्ण प्रसंगामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची लीला पाहून अर्थात, आपल्या पतीची लीला आणि औदार्य पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना ओवाळले. भगवान श्रीहरी विष्णूंनीसुद्धा माता लक्ष्मीला ओवाळणी दिली आणि त्या दिवसापासून पत्नी पतीचे औक्षण करते.

हेही वाचा: Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat: २ की ३ नोव्हेंबर, केव्हा साजरी केली जाणार भाऊबीज? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि भावाचे औक्षण करण्याची योग्य वेळ

पाडव्याचा मुहूर्त

शुभ मुहूर्त : सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपासून ते सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांपर्यंत.

तसेच सकाळी ५ ते ८ पर्यंत अमृत मुहूर्त आणि दुपारी ३ वाजून १२ मिनिटांपासून ते ४ वाजून ३६ मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त असेल.

या दिवाळीत पतीला ओवाळण्यासाठी संध्याकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत मुहूर्त असेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali padwa 24 why husband is celebrated on padwa day know the auspicious moment and mythological story of padwa sap