उदयराज साने
Donald Trump Horoscope Inauspicious Yoga Tariffs On India Astrology Prediction : भारताशी चांगले संबंध असणारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र मानणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारताविरोधात आक्रमक झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के टॅरिफव्यतिरिक्त भारतावर अतिरिक्त २५ टक्के दंड लागू केला आहे. रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू केले आहे. अशा प्रकारे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लादले आहे. त्यातील २५ टक्के टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू झाले आहे आणि उर्वरित २५ टक्के टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होईल. येत्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद कोणत्या क्षेत्रांवर उमटणार? भारताला त्यामुळे कोणत्या गोष्टीचा फटका बसणार का, ट्रम्प यांची कुंडली काय सांगते, याबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
“प्रथम वाढीव शुल्क भरमसाट लादायचे आणि नंतर प्रत्यक्ष ५० टक्क्यांपर्यंत कमी करायचे” हे सूत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत ज्या देशांवर टॅरिफ लादले आहे किंवा वाढवले आहे, त्यांच्या बाबतीत दिसून आले आहे. तसेच काहीसे आपल्या भारत देशाच्या बाबतीतही काही काळानंतर दिसेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी कुंडलीनुसार चंद्र, बुध, असे अत्यंत अशुभ योग त्यांच्या कुंडलीत आहेत. त्याचप्रमाणे मंगळ-हर्षल केंद्र योग आहेत. रवी-केतू, रवी-प्ल्युटो हेसुद्धा अशुभ योगात असल्यामुळे स्वतःच्या प्रकृतीची त्यांनी काळजी घ्यावी आणि मग जगाची उठाठेव करावी, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची एकंदर कुंडली सध्या दिसते आहे.
त्यांनी स्वतःहून त्यांच्या कृतीतून स्वतःचे शत्रू वाढवले आहेत. त्यांचे प्रकृतीबद्दलचे वाढते त्रास १२ ऑगस्टनंतर दिवसागणिक वाढत जाणार आहेत. भारताबरोबरील व्यापार करार लांबणीवर जाईल, असेसुद्धा दिसते आहे. शपथविधी कुंडलीत अनेक कुयोग असल्याने उर्वरित २०२५ म्हणजेच डिसेंबरपर्यंत त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांनी काळजी घ्यायला हवी, असे चित्र सध्या तरी दिसते आहे.
शेअर बाजाराची स्थिती कशी असणार?
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त टॅरिफचा शेअर बाजाराला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. त्यामुळे कदाचित महागाई वाढू शकते. ज्या ज्या वस्तूंवर कर वाढवला आहे, त्या त्या वस्तूंचे भाव असमान राहतील. कदाचित कमी होतील किंवा कमी केले जातील. त्यासाठी आता प्रत्यक्ष करार होण्याची वाट आपल्याला सगळ्यांना पाहावी लागणार आहे. कारण- अद्याप प्रत्यक्ष करार व्हायचा आहे. या करारासाठीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीचा दबाव म्हणून ही चाल खेळण्यात आली आहे.
भारताला फायदा होणार की नुकसान ?
अमेरिका आणि आपले संबंध आजपर्यंत चांगले होते; खूप चांगले नसले तरीही वाईटही नव्हते. पण, आता कारण नसताना अमेरिका वाकड्यात शिरते आहे. त्यामुळे हा मिठाचा खडा पडला आहे, असे आपण म्हणू शकतो. त्यामुळे येत्या काळात अतिरिक्त टॅरिफचा फटका करार झाल्यावरच आपल्याला स्पष्ट दिसून येईल. नवीन अतिरिक्त २५% टॅरिफ २१ दिवसांनी म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू होईल. २१ दिवसांनी या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे; पण २१ दिवसांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय मागे घेतला, तर परिस्थिती वेगळी दिसू शकते.