Dussehra And Vijaydashmi 2023 Date and Shubh Muhurat : दसरा हा आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा केला जाणारा मुख्य सण आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. यंदा मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा होणार आहे. हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक मानला जातो. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून दुष्टाईचा अंत केला, तर दुसऱ्या मान्यतेनुसार, दुर्गामातेने नऊ दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला. या दिवशी रावण दहनासह दुर्गा मातेच्या मूर्तीचेही विसर्जन केले जाते. संपूर्ण भारतात दसरा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. तसेच या दिवशी शस्त्र आणि शस्त्रांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. यावर ज्योतिषी अभिषेक संतोष घोगरे जोशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग दसऱ्याचे महत्व आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊ….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा कधी दसरा आहे?

यंदा आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४४ वाजता सुरू होत आहे. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३.१४ वाजता समाप्त होईल. त्यामुळे दसरा हा सण २४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. यावर्षी दसऱ्याला दोन अतिशय शुभ योग तयार होणार आहेत, एक रवि योग आणि दुसरा वृद्धी योगाचा संयोग.

दसऱ्याचे शुभ मुहूर्त

विजय मुहूर्त: २४ ऑक्टोबर २०२३, दुपारी ०१.५८ ते ०२.४३ पर्यंत आहे.

अभिजीत मुहूर्त: २४ ऑक्टोबर २०२३, सकाळी ११.४३ ते दुपारी १२.२८ पर्यंत आहे.

दसरा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा संपूर्ण दिवस शुभ असल्याचे मानले जाते. यावर्षी दसऱ्याला दोन अतिशय शुभ योग तयार होणार आहेत, एक मंगल योग आणि दुसरा भूमी वृद्धी योगाचा संयोग.

दसऱ्याचे महत्व

हिंदू मान्यतेनुसार, या दिवशी प्रभू श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून माता सीतेला त्यांच्या तावडीतून मुक्त केले, अशाप्रकारे रावणाच्या दुष्टकर्मांचा अंत करत त्यांनी विजय मिळवला. या कारणास्तव या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. या अभूतपूर्व विजयामुळे या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते.

पौराणिक कथेनुसार, महिषासुर नावाचा एक राक्षस होता, ज्याला ब्रह्मदेवाची उपासना करून वरदान मिळाले होते की, पृथ्वीवर कोणीही त्याचा पराभव करू शकणार नाही, म्हणजे त्याचा वध करू शकणार नाही. त्याने आपल्या पापाने महिषासुरापासून कलह निर्माण केला होता. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी आपल्या सामर्थ्याने देवी दुर्गा निर्माण केली. माँ दुर्गा आणि महिषासुराचे युद्ध नऊ दिवस चालले आणि १० व्या दिवशी माँ दुर्गाने राक्षसाचा वध केला. तेव्हापासून विजया दशमीचा सण साजरा केला जातो.

दसऱ्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. यंदा रावण दहन २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४३ वाजल्यापासून सुरू होणार आहे. रावणाचे दहन केल्याने रोग, शोक, दोष, प्रतिकूल ग्रहस्थिती आणि संकटांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केलेच पाहिजे असे म्हटले जाते.

दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्र पूजनालाही विशेष महत्व आहे. पूर्वी प्रत्येकाच्या घरी पारंपरिक शस्त्रांची पूजा केली जायची, पण आता आधुनिक शस्त्र म्हणजे वही, पुस्तक, पेन, लॅपटॉप, मोबाईल यांची पूजा केली जाते.

मान्यतेनुसार, दसऱ्याच्या दिवशी पंचांग बघितले जात नाही. कारण हे वार्षिक साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू शकतो, जसे की नवीन घर, गाडी खरेदी, भूमीपूजन करणे, नवीन ऑफिस घेणे, सोने खरेदी, तसेच कोणतेही शुभ कार्य करू शकता; जसे की, लग्न, साखरपुडा, मुंज, डोहाळे जेवण अश्या बऱ्याच शुभ गोष्टी केल्या जातात. या दिवशी देवांची, पूर्वजांची तसेच आपल्या संपत्तीतील गाडी, घर, दुकान, ज्ञान या सर्वांची पूजा केली जाते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dussehra 2023 why we celebrate dussehra history shubh muhurt and importance sjr