Atichari Gati Jupiter 2025: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा राशी परिवर्तन म्हणजेच गोचर हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः गुरू ग्रह, ज्याला देवगुरू म्हटले जाते, त्याचा गोचर तर राशींच्या लोकांचे नशिबाचं चक्र फिरवतो, असं मानलं जातं. साधारणपणे गुरू दरवर्षी एकदाच राशी बदलतात; पण या वर्षी गुरू ग्रहानं आपली गती बदलली असून, तो अतिचारी गतीनं प्रवास करीत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपल्या नेहमीच्या गतीपेक्षा वेगानं पुढे सरकतो, त्याला अतिचारी गती, असं म्हणतात.
याच पार्श्वभूमीवर यंदा गुरू ग्रहानं १४ मे रोजी मिथुन राशीत प्रवेश केला होता; पण आता फक्त काही महिन्यांतच म्हणजे १८ ऑक्टोबर २०२५ रोजी गुरू पुन्हा एकदा आपलं घर बदलून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. एवढंच नाही, तर ५ डिसेंबरला तो पुन्हा एकदा मिथुन राशीत परत येईल. त्यामुळे या काळात राशिचक्रामध्ये मोठा बदल होणार आहे. काही राशींच्या लोकांना शुभ फळं मिळणार असली तरी काही राशींच्या लोकांना याचा फटका बसणार आहे. चला पाहूया, गुरूच्या या कर्क राशीतल्या गोचराचा कोणत्या तीन राशींवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
गुरूच्या अतिचारी गोचरामुळे ‘या’ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती डगमगणार?
वृषभ
गुरूचा गोचर तुमच्या तृतीय भावात होत असल्यानं हा काळ थोडासा आव्हानात्मक ठरू शकतो. त्यामुळे अचानक खर्च वाढतील आणि तुमची आर्थिक स्थिती ढासळू शकते. शारीरिकदृष्ट्या थकवा जाणवेल आणि आरोग्य खालावेल. नातेसंबंधांमध्ये अनावश्यक वाद टाळा. या काळात तुमचे काम आणि व्यवसाय मंदावू शकतात आणि या काळात तुमचे पैसे अडकू शकतात.
सिंह
या काळात तुम्हाला आळस आणि निष्क्रियता भारी पडू शकते. अपूर्ण राहिलेलं काम अडकून बसेल. शत्रू सक्रिय होतील आणि पाठीमागून ते डाव खेळू शकतात. कामाच्या ठिकाणी व समाजात फारच सावधगिरी बाळगावी लागेल. कोणावरही अति विश्वास ठेवू नका आणि गुपितं कुणालाही सांगू नका. आर्थिक बाबतीत कुठलाही निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
कुंभ
गुरूचा गोचर तुमच्या षष्ठम भावात होत असल्यानं मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण प्रचंड वाढेल आणि त्यामुळे यश मिळवण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतील. या काळात कर्ज घेणं वा देणं टाळा; अन्यथा संकटात सापडाल. बाहेरचं तळलेलं जंक फूड खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करू नका.
एकूणच पाहता, दिवाळीपूर्वी गुरूच्या या अतिचारी गतीनं होणाऱ्या गोचरामुळे काही राशींच्या लोकांना कठीण आव्हानांचा सामना करावा लागेल. मात्र संयम व सतर्कता यांमुळे या अडचणींवर मात करता येऊ शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)