-सोनल चितळे
July Monthly Horoscope For Zodiac Signs: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ग्रहांचे मोठे बदल होत असतात. तसेच काही नक्षत्रेसुद्धा या महिन्यात जागृत होत असतात. त्यामुळे १२ राशींवर याचा कमी-अधिक, शुभ-अशुभ अशा स्वरूपात प्रभाव दिसून येतो. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार जुलै महिन्यात आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा व संकष्टी चतुर्थीसुद्धा असणार आहे. तर ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्या माहितीनुसार येत्या जुलै महिन्यातील ३१ दिवसांत १२ राशींपैकी कोणत्या राशींच्या लोकांना कधी लाभ, तर कोणाला काय काळजी घ्यावी लागणार याबद्दल जाणून घेऊ…
जुलै महिन्याचे १२ राशींचे भविष्य (Monthly Horoscope For July 2025)
मेष जुलै राशिभविष्य (Aries July Horoscope 2025)
अडचणीतून मार्ग काढत पुढे जाण्याची तयारी ठेवलीत, तर कामे वेगाने होतील. तंत्रज्ञानाला कलात्मकतेची जोड मिळेल. आषाढी एकादशी जगण्याचे नवे धडे शिकवेल, तर गुरुपौर्णिमा ज्येष्ठांचे मार्गदर्शन प्राप्त करून देईल. नोकरी, व्यवसायात वितंडवाद घालू नका. नातेवाइकांमध्ये आपली योग्यता कृतीतून दाखवाल. विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील. गुंतवणूक करताना विशेष दखल घेतली नाहीत, तर तोटा सहन करावा लागेल. जुने येणे वसूल होईल. अर्थात, त्यामागे आपले अथक परिश्रम असतील. मालमत्तेसंबंधीचे वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. चंचल मन आणि अस्थिर विचार यांचा तब्येतीवर परिणाम होईल.
वृषभ जुलै राशिभविष्य (Taurus July Horoscope 2025)
ग्रहमानाची चांगली साथ असल्याने जीवनाला गती येईल. रेंगाळलेली कामे पुढे सरकतील; तसेच अधिक लक्ष घातल्यास ती पूर्ण होतील. आषाढी एकादशीला मनपसंत बातमी समजेल. विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेला गुरुजनांच्या मार्गदर्शनाचा विशेष लाभ मिळेल. नोकरी-व्यवसायात आलेले कटू अनुभव मोठी शिकवण देणारे ठरतील. ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळींचे साह्य मिळेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत. जोडीदाराच्या कामात यश येईल. एकमेकांवरचा विश्वास आणि आदर दृढ होईल. आधी केलेली गुंतवणूक लाभकारक ठरेल. विचारांमध्ये एकवाक्यता ठेवल्यास इतरांवर आपला खूप जबरदस्त प्रभाव पडेल. हितशत्रूंना कोणतीही संधी देऊ नका. कामाचा व्याप वाढला तरी ताण घेऊ नका.
मिथुन जुलै राशिभविष्य (Gemini July Horoscope 2025)
आवश्यकता आणि उपयुक्तता तपासून मगच खर्च करावा. आषाढी एकादशी मनावर ताबा मिळविण्यास साह्य करेल. विद्यार्थिवर्गाने अभ्यासावर मन एकाग्र करावे. नियमितपणाने घेतलेली मेहनत लाभदायक ठरेल. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षक आणि मित्रांच्या साह्याने शंका दूर होतील. नोकरी-व्यवसायात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. विवाहोत्सुकांचे विवाह योग जुळून येतील. ओळखीचे रूपांतर नात्यात होण्याची शक्यता आहे. संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. त्यासाठी वैद्यकीय सल्ला किंवा उपचार घ्यावे लागतील. घराच्या संबंधातील बोलणी आकार घेतील. वडिलोपार्जित इस्टेटीबाबत विचारविनिमय होतील. तज्ज्ञ वकिलांचा सल्ला उपयोगी पडेल. गुंतवणूकदारांना चांगला लाभ अपेक्षित आहे. कफ, खोकला व सर्दीचा त्रास देईल.
कर्क जुलै राशिभविष्य (Cancer July Horoscope 2025)
वातावरणातील बदल काहीसा उमेद वाढवणारा असेल. आषाढी एकादशी उत्साह घेऊन येईल. विद्यार्थिवर्गाने वर्षाच्या सुरुवातीपासूनच वेळापत्रक आखून, त्याचे पालन करावे. गुरुपौर्णिमेदरम्यान गुरुजनांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायानिमित्त लहान-मोठे प्रवास कराल. लोकांच्या ओळखी, भेटी आर्थिकदृष्ट्या लाभकारक ठरतील. समस्या, प्रश्न सोडविताना भावनेच्या आहारी न जाता, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. विवाहित दाम्पत्यांना कुटुंबासाठी वेळ राखून ठेवावा लागेल. सामाजिक बांधिलकी जपणे महत्त्वाचे ठरेल. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक लाभदायक असेल. दीर्घकालासाठी विचार केल्यास अधिक फायदा होईल. पित्ताच्या त्रासावर ठोस उपाय करणे अतिशय गरजेचे आहे.
सिंह जुलै राशिभविष्य (Leo July Horoscope 2025)
‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे आपण आपल्या हिमतीने दिलेला शब्द पाळाल. याचा इतरांवर खूपच चांगला प्रभाव पडेल. आपला भाव वधारेल. आषाढी एकादशीला उत्साह वाढेल. विद्यार्थिवर्गाला आपल्यातील कलागुणांना उत्तम वाव देता येईल. विद्यार्थ्यांचे नेतृत्व कराल. अडचणी, समस्या प्रभावीपणे मांडाल. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभेल. नोकरी-व्यवसायात कामातील तोच तोपणाचा कंटाळा येईल. नवे करण्याची जिद्द मनात बाळगाल आणि अमलातही आणाल. विवाहोत्सुकांचे जोडीदार संशोधन यशस्वी ठरेल. घरासंबंधीच्या खरेदी-विक्रीचे निर्णय झटपट घेऊ नका. कागदपत्रांची खातरजमा करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांना लाभकारक ग्रहमान आहे. तरीही लोभ टाळावा. डोके, पाठ व मणका यांचे आरोग्य सांभाळावे.
कन्या जुलै राशिभविष्य (Virgo July Horoscope 2025)
सगळी कामे आपल्या मनाप्रमाणे होतीलच, असे नाही. ज्यावर आपले नियंत्रण नाही, त्या गोष्टी आहेत तशा स्वीकारणे गरजेचे ठरेल. आषाढी एकादशीला द्विधा मन:स्थिती होईल. विद्यार्थिवर्गाच्या शंकांचे निरसन होईल. अभ्यासू वृत्तीमुळे गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल. गुरुपौर्णिमेचे चांगले फळ मिळेल. नोकरी-व्यवसायात उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल. सहकारीवर्गाच्या वतीने त्यांच्या समस्या व्यवस्थापन मंडळासमोर प्रभावी भाषेत मांडाल. विवाहोत्सुकांनी वधू-वर संशोधन सुरू ठेवावे. ग्रहमान अनुकूल आहे. विवाहितांना एकमेकांच्या सहवासाचा लाभ सुखकर ठरेल. वादविवाद, गैरसमज दूर होतील. सरकारी कामे धीम्या गतीने पुढे जातील. पाठपुरावा केला नाहीत, तर कामे ठप्प होतील. गुंतवणूकदारांनी मोठी जोखीम स्वीकारू नये. सुरक्षित गुंतवणूक उत्तम लाभ देईल. हाडांचे विकार, ताप येणे यांमुळे चिडचिड वाढेल.
तूळ जुलै राशिभविष्य (Libra July Horoscope 2025)
मेहनतीला शिस्तीची जोड मिळाली, तर अधिक चांगले फळ मिळू शकते हे शिकवणारा हा महिना असेल. आषाढी एकादशीच्या दिवशी आनंदाची बातमी समजेल. विद्यार्थिवर्ग सुरुवातीपासून नियमितता अंगी बाणवेल. गुरुपौर्णिमा आत्मविश्वास वाढवणारी असेल. गुरुजनांच्या मार्गदर्शनाने यशस्वी व्हाल. नोकरी-व्यवसायात बदल आणि बढती यासाठी पूरक ग्रहमान आहे. प्रयत्न सफल होतील. विवाहोत्सुकांना अनुरूप जोडीदार मिळेल. विवाहितांनी कुटुंबासाठी वेळ राखून ठेवावा. सहवासाने प्रेम आणि ओढ वाढेल. मालम्ततेच्या कागदपत्रांची नीट तापसणी करावी. तज्ज्ञ वकिलांची नेमणूक कराल. गुंतवणूकदार उंच भरारी घेतील.
वृश्चिक जुलै राशिभविष्य (Scorpio July Horoscope 2025)
हिंमत आणि जिद्द यांच्या जोरावर मोठा पल्ला गाठायचा आहे. धीम्या गतीने का होईना; पण पुढे जात राहणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थिवर्गाची मेहनत वाखाणण्याजोगी असेल. आषाढी एकादशी एकाग्रतेचे सूत्र देऊन जाईल. नोकरी-व्यवसायात गुरुपौर्णिमेदरम्यान वरिष्ठांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य मिळेल. विवाहित दाम्पत्यांनी शब्द जपून वापरावेत. वादविवाद टाळावेत. जमीनजुमला, मालमत्ताविषयक बारकावे नीट समजून घ्याल. दीर्घ मुदतीची गुंतवणूक करण्यापेक्षा अल्पकाळात नफा घेऊन बाहेर पडावे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील. मानसिक ताण वाढेल. वैद्यकीय सल्ला, तपासणी व औषधोपचार घेणे महत्वाचे आहे.
धनु जुलै राशिभविष्य (Sagittarius July Horoscope 2025)
कर्तव्य पार पाडणे आपल्या हाती आहे. त्याचे फळ कसे व काय मिळेल याची चिंता करू नये. विद्यार्थिवर्ग जोमाने अभ्यासाला लागेल. शिक्षकांचा उत्तम पाठिंबा मिळेल. आषाढी एकादशीच्या सुमारास आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश मिळाल्याचा आनंद काही औरच असेल. नोकरी-व्यवसायात आपले अंदाज खरे ठरतील. काळाची पावले ओळखून पुढील पायरी ओलांडाल. गुरुपौर्णिमा नवी संधी घेऊन येईल. गुरुबल चांगले असल्याने विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहित दाम्पत्यांना कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. घराचे कामकाज तज्ज्ञांकडून तपासून घ्यावे. खाचाखोचा समजून घ्याव्यात. गुंतवणूकदारांनी संयम ठेवावा. श्वसनास त्रास होईल. छातीत कफ दाटेल. वैद्यकीय उपचार घ्यावेत.
मकर जुलै राशिभविष्य (Capricorn July Horoscope 2025)
मेहनत, जिद्द व सराव या त्रिगुणांचा प्रभाव या महिन्यात प्रकर्षाने दिसून येईल. आपल्या हक्काचा मोबदला मिळेल. विद्यार्थिवर्ग जोमाने अभ्यासाला लागेल. आषाढी एकादशीच्या आसपास लाभकारक घटना घडेल. नोकरी-व्यवसायात पैसे, मानमरातब आणि प्रसिद्धी मिळेल. गुरुपौर्णिमेला प्रवास योग आहे. देश-विदेश फिराल. धार्मिक तीर्थक्षेत्राला भेट द्याल. विवाहोत्सुक मंडळींनी वधू-वर संशोधन सुरू ठेवावे. विवाहित दाम्पत्यांनी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी वेळ राखून ठेवावा.मालमत्तेसंबंधीचे प्रश्न लांबणीवर पडतील. मध्यस्थामार्फत व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. कायद्याच्या कचाट्यात पडू नका. गुंतवणूकदारांना नव्या संधी उपलब्ध होतील. आपल्या कष्टाचे पैसे डोळसपणे गुंतवा. ते दीर्घ मुदतीसाठी ठेवल्यास लाभदायक ठरेल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे. औषधोपचारासह व्यायामाचेदेखील महत्त्व लक्षात घ्यावे.
कुंभ जुलै राशिभविष्य (Aquarius July Horoscope 2025)
ग्रहस्थिती पूरक असली तरी साडेसातीचा प्रभाव दिसून येईल. हाती घेतलेली कामे धीम्या गतीने पुढे सरकतील. विद्यार्थिवर्गाला अभ्यासात योग्य मार्गदर्शन मिळेल. नव्या समस्या, नवी आव्हाने समर्थपणे पेलाल. आषाढी एकादशीदरम्यान नोकरी-व्यवसायात आपल्या सखोल ज्ञानाचा आणि अभ्यासू वृत्तीचा उत्तम प्रभाव पडेल. सहकारीवर्गाकडून कामे करून घ्यावी लागतील. आपल्या बौद्धिक वेगापुढे इतरांचा वेग आपणास कमी वाटेल. गुरुपौर्णिमा लाभकारक ठरेल. विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील. काही गोष्टींमध्ये तडजोड करण्याची तयारी ठेवावी. विवाहित मंडळींना कुटुंबासाठी काहीतरी करून दाखविता येईल. मित्रपरिवाराची मदत उल्लेखनीय असेल. मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी करावी. ऐन वेळी एखादा दस्तऐवज कमी-अधिक असण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांसाठी परिस्थितीत बदल नाही.
मीन जुलै राशिभविष्य (Pisces July Horoscope 2025)
नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी दाखवाल. आषाढी एकादशी भाग्याची दिंडी घेऊन येईल. विद्यार्थिवर्ग प्रयत्नांची पराकाष्ठा करील. नवा अभ्यासक्रम, नवा विषय आत्मसात करण्यासाठी शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन घ्यावे लागेल. गुरुपौर्णिमा फलदायी ठरेल. नोकरी-व्यवसायात नवे प्रयोग न करता, आहे तेच कामकाज नीट सांभाळाल. हितशत्रूंचा त्रास वाढेल; पण धीर खचू देऊ नका. गुरुबल कमजोर असल्याने विवाह योग लांबणीवर जातील. विवाहित दाम्पत्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात भरारी घेताना कौटुंबिक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. घराचे निर्णय अनुत्तरित राहतील. कोर्टाचा निकाल रखडेल. गुंतवणूक करताना सत्यता आणि सुरक्षितता यांची पडताळणी करून घ्यावी. फायदा कमी झाला तरी हरकत नाही; पण तोटा अजिबात होऊ देऊ नका. पोटाची काळजी घ्यावी. उलट्या होणे, अपचन होणे, असे त्रास डॉक्टरी उपायांनी दूर कराल.
तर १२ राशींसाठी जुलै महिना असा असणार आहे…