Saturn Sade Sati Astrology Prediction: शनी साडेसाती… ज्योतिषशास्त्रातला सर्वांत गूढ आणि भीषण काळ. या काळात माणसाच्या आयुष्यात संकटं, आर्थिक नुकसान, कौटुंबिक मतभेद व मानसिक त्रास यांचा भडका उडतो. ज्योतिषशास्त्रात शनी साडेसाती ही अशी संज्ञा आहे की, जिचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांना धडकी भरते. कारण- या काळात माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार, अडचणी, संघर्ष व अनपेक्षित संकटं येतात, असं मानलं जातं. शनी साडेसाती एकूण साडेसात वर्ष चालते आणि तिचे तीन टप्पे असतात. प्रत्येक टप्प्याचा कालावधी अडीच वर्षांचा असतो.

शनी ग्रहाला न्यायाचा देव मानलं जातं; पण जेव्हा तो साडेसातीच्या रूपाने जीवनात येतो तेव्हा प्रत्येकाला त्याच्या कर्मांचं फळ भोगावंच लागतं. शनी साडेसातीचं नाव घेतलं तरी लोक घाबरतात, कारण- या काळात आयुष्यावर अडचणींचं सावट गडद होतं. सध्या मेष राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा, मीन राशीवर दुसरा, तर कुंभ राशीवर तिसरा टप्पा सुरू आहे. ज्योतिषी सांगतात की, पहिल्या टप्प्यात शनी मस्तकावर बसतो आणि त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. तिसऱ्या टप्प्यात वाद-विवाद, कौटुंबिक तणाव टाळण्याची आवश्यकता असते. पण, या सगळ्यांत सर्वांत कठीण, भीषण व त्रासदायक मानला जाणारा टप्पा म्हणजे साडेसातीचा दुसरा टप्पा!

दुसऱ्या टप्प्यात शनी साडेसातीची ताकद सर्वाधिक असते. या काळात व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात प्रचंड अस्थिरता निर्माण होते. घरगुती वातावरण बिघडतं, नातेवाइकांशी मतभेद होतात, व्यवसायात नुकसान होण्याची भीती कायम असते. पैशांच्या बाबतीत धक्का बसतो. मित्रसुद्धा साथ सोडू शकतात आणि मानसिक तणाव प्रचंड वाढतो. त्यामुळे या काळात त्या व्यक्तीला प्रत्येक निर्णय फार काळजीपूर्वक घ्यावा लागतो.

अनेकांचा प्रश्न असतो – पुढचा हा सर्वांत त्रासदायक टप्पा नक्की कोणत्या राशीवर सुरू होणार? ज्योतिषशास्त्रानुसार, ३ जून २०२७ रोजी शनी मेष राशीत प्रवेश करताच या राशीच्या लोकांसाठी सुरू होईल साडेसातीचा दुसरा व सर्वांत भयानक टप्पा. म्हणजेच मेष राशीच्या लोकांसाठी पुढील काळ धैर्य, संयम व कठोर परिश्रमाची खरी कसोटी ठरणार आहे. त्याचबरोबर मीन राशीवर या काळात साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल; तर वृषभ राशीवर याची पहिली सुरुवात होईल.

थोडक्यात सांगायचं झालं तर, मीननंतर आता मेष राशीवर शनी साडेसातीचा सर्वांत भीषण दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)