Shani Amavasya 2025 : आज हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्या आहे. शनिवारी अमावास्या येत असल्याने या अमावास्येला ‘शनी अमावास्या’देखील म्हणतात. या दिवशी दान करण्याबरोबर शनिदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. जर तुमच्या कुंडलीत शनीची साडेसाती, शनी महादशा किंवा शनी दोष असेल, तर या दिवशी शनी देवाची विधिवत पूजा करण्याबरोबरच तुम्ही काही विशेष उपाय करू शकता.

कधी आहे शनी अमावस्या ?

२२ ऑगस्टपासून सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी शनी अमावस्या सुरू होईल आणि २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी ती संपेल. त्यामुळे तिथीनुसार शनी अमावास्या आज शनिवारी २३ ऑगस्टला असणार आहे.

शनी अमावास्येला कोणती कृती फायदेशीर?

शनी अमावास्येच्या दिवशी, शनि देवाची योग्य पद्धतीने पूजा करा. त्यासोबतच, “ॐ शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करणे खूप फायदेशीर ठरू शकते. तसे केल्याने, साडेसाती आणि ध्येयात येणाऱ्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम कमी होऊ शकतो. त्याबरोबरच मानसिक ताणतणावापासून सुटका होऊन, आत्मविश्वास आणि संयम वाढू शकतो.

शनि अमावस्येला व्रत ठेवा

या वर्षी शनी अमावास्या नेमकी शनिवारी येत आहे. अशा परिस्थितीत या दिवशी व्रत करणे शनी देवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही या दिवशी फळ खाऊन व्रत ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला पुण्य मिळते आणि कुंडलीतील शनी दोष दूर होतात, असे मानले जाते.

काळे तीळ अर्पण करा

काळे तीळ शनी देवाशी संबंधित आहेत. म्हणून शनी अमावास्येच्या दिवशी काळे तीळ घेऊन शनी मंदिरात अर्पण करा. त्याशिवाय मोहरीच्या तेलात काळे तीळ घालून, ते शनी देवाला अर्पण करणे फायदेशीर ठरू शकते.

दानधर्म करा

शनी अमावास्येच्या दिवशी दान करणे खूप फायदेशीर आहे. या दिवशी शनी देवाशी संबंधित काळे कपडे, ब्लँकेट, काळी उडीद डाळ, काळे तीळ, लोखंडी भांडी, मोहरीचे तेल इत्यादी वस्तू दान करणे फायदेशीर ठरू शकते.

पिंपळाच्या झाडाची पूजा करा

शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाचे झाड खूप पवित्र मानले जाते. शनी अमावास्येला किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनी दोषाचा प्रभाव कमी होतो.