Ashtami Tithi 2025 Date: हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. यंदा २२ सप्टेंबर रोजी प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून, १ ऑक्टोबर रोजी महानवमी म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल. तसेच २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) साजरी केली जाईल. परंतु नवरात्रीच्या काळात तृतीया तिथी तब्बल दोन दिवस म्हणजेच (२४ व २५ सप्टेंबर रोजी होती.) त्यामुळे नवरात्री नऊऐवजी १० दिवसांची असेल. दरम्यान, यामुळे आता अष्टमी नक्की कधी साजरी याबाबतही अनेकजण संभ्रमात पडले आहेत.

नवरात्रीची अष्टमी तिथी कधी?

अष्टमी तिथीला नवरात्रीमध्ये खूप महत्वपूर्ण मानले जाते. या दिवशी देवीच्या मंत्र, स्तोत्रांचे पठण करणे, होमहवन करणे, कुंकूमार्चन, कन्या पूजन करणे अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे अष्टमी तिथी २९ सप्टेंबरला आहे की ३० याबाबत अनेकजण संभ्रमात पडले आहेत.

पंचांगानुसार अष्टमी तिथीची सुरूवात २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांनी होणार असून ही तिथी ३० सप्टेंबर रोजी ६ वाजून ६ मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार ३० सप्टेंबर रोजी नवरात्री अष्टमी साजरी केली जाईल. या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा-आराधना केली जाते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)