श्रावणी सोमवार व संकष्टी चतुर्थीचा दुग्धशर्करा योग; आज कोणती शिवामूठ वाहावी, जाणून घ्या

श्रावणी सोमवारी शंकराचे पूजन करून धान्याची मूठ म्हणजेच शिवामूठ शंकराच्या पिंडीवर वाहिली जाते.

श्रावणी सोमवार व संकष्टी चतुर्थीचा दुग्धशर्करा योग; आज कोणती शिवामूठ वाहावी, जाणून घ्या
श्रावणी सोमवार व संकष्टी चतुर्थीचा दुग्धशर्करा योग (फोटो: संग्रहित)

Shravan Somwar 2022: स्कंद पुराणानुसार भगवान शंकरांचा आवडता महिना म्हणजे श्रावण. आज १५ ऑगस्टला श्रावणातील तिसरा सोमवार आहे. विशेष म्हणजे यंदा श्रावणी सोमवारीच संकष्टी चतुर्थी किंवा हेरंब चतुर्थीचा योग सुद्धा जुळून आला आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंकराच्या प्रतिमा किंवा पिंडीवर शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शिवामूठ वाहताना मुग अर्पण करायचे आहेत. याबाबतचे नियम व पूजा विधी आपण जाणून घेऊयात…

साधारणतः हिंदू रीतीनुसार, श्रावणी सोमवारी शंकराचे पूजन करून धान्याची मूठ म्हणजेच शिवमूठ शंकराच्या पिंडीवर वाहिली जाते. ही पूजा सोयीनुसार मंदिरात जाऊन अथवा घरी केली तरी चालते. साधारणतः नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच सलग वर्षे शिवामूठ वाहावी अशी पद्धत आहे. यंदा १५ ऑगस्ट ला मुग व २२ ऑगस्टला जव अशी धान्यांची शिवामूठ वाहायची आहे. ज्या श्रावणात पाचवा सोमवार येतो तेव्हा सातूची शिवामूठ वाहिली जाते.

Sankashti Chaturthi August 2022: श्रावणातील संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय ‘हा’ योग; पहा पूजा विधी व चंद्रोदयाची वेळ

श्रावण सोमवारचे महत्त्व

स्कंद पुराणातील आख्यायिकेनुसार, प्रत्येक जन्मी शंकरालाच वरण्याचे व्रत देवी सतीने घेतले घेते, एका जन्मी वडिलांच्या इच्छेविरुद्ध देवी सतीने भगवान शंकरांशी विवाह केला त्यावेळी वडिलांनी शंकरांचा अपमान केल्याने दुःखी होऊन माता सतीने देहत्याग केला व हिमालयाच्या पोटी माता सतीने पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला. माता पार्वतीने श्रावण महिन्यात कठोर उपवास करून शिव शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याशी विवाह केला. यातूनच पुढे सोळा सोमवारचे व्रत करण्याची रीत सुद्धा प्रचलित झाली. याशिवाय समुद्रमंथनातुन प्राप्त झालेले हलाहल विष प्राशन करून शिवशंकरांनी मनुष्याला संकटातून तारले होते, यासाठी महादेवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणात शंकराचे पूजन आवर्जून करावे अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे.

शिवमूठ वाहून झाल्यावर साधारण पुढल्या दिवशी उत्तरपूजा केली जाते, यावेळी शंकराचे नामस्मरण करावे व आपण वाहिलेले धान्य गोळा करून मग त्यात आणखी थोडी भर करून गरजूंना देण्याची पद्धत आहे. पूजेच्या रूपातून गरजूंची मदत हा उद्देश प्रत्येक सणांमधून जपला जावा हा संदेश श्रावणी सोमवार देऊन जातो.

( टीप- सदर लेख गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार १५ ऑगस्ट २०२२
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी