Horoscope July to December 2025: २०२५ चं अर्ध वर्ष संपलं आहे, पण खरी कसोटी आणि बदलाचं वळण आता येणाऱ्या सहा महिन्यांत घडणार आहे. आकाशातील ग्रहांच्या गूढ हालचाली वेग घेत आहेत. शनींचं नवे स्थान, गुरुंचं अतिचारी होणं आणि मंगळाचा तुफानी प्रवास, अनेक ग्रहांच्या हालचाली या सगळ्यामुळे एका विशिष्ट राशीच्या नशिबात मोठा भूकंप घडणार आहे का? नातेसंबंध, आरोग्य, करिअर, संपत्ती आणि दैनंदिन जीवनावर याचा नेमका काय परिणाम होणार? ग्रहांच्या हालचालीमुळे ज्योतिषशास्त्रात कोणते इशारे दिले आहेत जाणून घेऊया…

१२ राशींपैकी एका राशीच्या मंडळींसाठी २०२५ वर्षाचा उत्तरार्ध अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये तब्येतीत चढ-उतार, वैवाहिक तणाव, आर्थिक संकट, संतानाशी मतभेद, न्यायालयीन प्रकरणं आणि अचानक होणाऱ्या खर्चाने अनेकांना त्रस्त केलं. विशेषतः ऑक्टोबर २०२४ ते जून २०२५ या काळात मंगळ ग्रहाचं गोचर अत्यंत कठीण होतं, ज्याचा परिणाम आरोग्य, संबंध आणि आर्थिक स्थितीवर दिसून आला.

पण, आता ग्रहांच्या बदलत्या हालचालीमुळे या एका राशीच्या नशिबात सकारात्मक वळण आणण्याचे संकेत देत आहेत. शनी मीन राशीत लाभ भावात, तर गुरु द्वितीय भावात विराजमान आहेत. या दोन्ही ग्रहांची कृपा अनेक अडथळे दूर करून जीवनात स्थैर्य निर्माण करणार आहे. शनीच्या दृष्टीनं पहिल्या, पाचव्या आणि अष्टम भावांवर प्रभाव पडणार असून त्यामुळे आरोग्य सुधारेल, संशोधन, शिक्षण व प्रशासन क्षेत्रात यश लाभेल. सासरकडील संबंध सुधारतील आणि कर्जमुक्तीचा मार्गही मोकळा होईल.

गुरुची अष्टम, सहावा आणि दहावा भावावर दृष्टी करिअर, अचानक धनलाभ, जुनी देणी वसूल होणं आणि व्यवसाय विस्तारास मदत करेल. त्याचबरोबर राहुच्या नकारात्मक परिणामांवरही गुरुचा प्रभाव सकारात्मक असेल. पण ही कोणती रास आहे, जाणून घ्या…

वृषभ राशीच्या जीवनात मोठा बदल!

मंगळ ७ जून २०२५ रोजी सिंह राशीत प्रवेश करून सप्तम, अष्टम आणि दशम भावावर दृष्टिपात करतोय, त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये संधी मिळतील, वैवाहिक तणाव कमी होईल आणि कार्यक्षेत्रात यशाच्या नव्या वाटा खुल्या होतील. प्रॉपर्टीविषयक व्यवहार होण्याची शक्यता असून, त्यात आर्थिक लाभही संभवतो.

शेअर मार्केटमधूनही फायदे संभवतात, पण प्रथम संतानाशी मतभेद होण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहावं लागेल. परदेशातून कामधंद्याच्या संधी मिळतील. शुक्राच्या कृपेने वाणी व स्वभाव संतुलित राहील, जरी शनीमुळे थोडी कठोरता जाणवू शकते.

जुलै ते डिसेंबर २०२५ दरम्यान वृषभ राशीच्या लोकांसाठी आयुष्यातील अनेक बंद दारं उघडणार आहेत. योग्य नियोजन, संयम आणि सातत्य ठेवल्यास हे सहा महिने नशिबात सकारात्मक बदल घडवू शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)