Mulank compatibility for marriage: पती-पत्नीमध्ये जुळवण्यासाठी आणि आनंदी जीवन सुनिश्चित करण्यासाठी मॅचमेकिंग केलं जातं. मात्र, अंकशास्त्रानुसारही याचा अंदाज लावला जाऊ शकतो की एखादं जोडपं पती-पत्नी म्हणून एकमेकांना पूरक आहे की नाही. विशिष्ट मूलांक असलेल्या लोकांनी एकमेकांशी लग्न करणं टाळावं असं अंकशास्त्रानुसार सांगितलं जातं.

जन्मतारखेनुसार विवाह सुसंगतता

मूळ संख्या ही जन्मतारखेची बेरीज असते. म्हणजेच महिन्याच्या १,१०,१९ किंवा २८ तारखएला जन्मलेल्या व्यक्तीची मूळ संख्या १ असेल. अंकशास्त्र प्रत्येक मूळ संख्येसाठी सुसंगत मूळ संख्येचं वर्णन करते. याचा अर्थ असा की मूळ संख्या असलेले लोकांचं एकमेकांशी चांगलं जुळतं. शिवाय ३६ पर्यंत बेरीज करणाऱ्या मूळ संख्यांचे संयोजनदेखील दिसते. या संख्या असलेले लोक एकमेकांसाठी उत्तम जोडीदार नाहीत. त्यांच्या परस्परविरोधी स्वभावामुळे त्यांचे नाते कमकुवत होते. म्हणूनच त्यांनी लग्न करणं टाळावं. असं असताना काही प्रकरणांमध्ये परस्पर प्रेम, आदर, विश्वास आणि समजूतदारपणा या घटकांवर मात करतो. या संख्या संयोजनांबाबत सविस्तर जाणून घेऊ…

मूलांक १ आणि ४

अंक १ म्हणजे १,१०,१९ आणि २८ तारखेला जन्मलेले लोक. हा अंक सूर्याच्या अधिपत्याखाली असतो आणि त्याचे रहिवासी मेहनती, संघटित आणि चांगले नेतृत्व कौशल्य असलेले असतात. ते खूप आत्मविश्वासू असतात. दरम्यान, ४ अंक असलेले म्हणजेच ४,१३,२२ आणि ३१ तारखेला जन्मलेले लोक. हे राहूच्या प्रभावामुळे हट्टी स्वभावाचे असतात. ते सहजपणे वाईट सवयींना बळी पडतात. त्यांचा अहंकार, संघर्ष, एकमेकांवर निर्णय लादण्याची प्रवृत्ती आणि परस्परविरोधी स्वभाव वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करतात.

मूलांक २ आणि ४

२ मूलांक असलेले म्हणजे २,११,२० आणि २९ तारखेला जन्मलेले लोक. हे चंद्राच्या प्रभावामुळे भावनिक आणि प्रेमळ असतात. ४ क्रमांकाचे लोक म्हणजे ४,१३,२२ आणि ३१ तारखेला जन्मलेले लोक. ते राहूच्या प्रभावामुळे स्वभावाने व्यावहारिक असतात. ते स्वत:च्या फायद्यासाठी अनेकदा फसवणूक करण्यासदेखील तयार असतात. यामुळे या लोकांमध्ये भावनिक अंतर निर्माण होऊ शकते आणि ते एकमेकांच्या भावना समजून घेण्यास असमर्थ देखील असू शकतात.

मूलांक ३ आणि ८

३ या अंकावर म्हणजेच ३,१२,२१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांवर गुरू ग्रहाचे राज्य असते, तर ८ अंक म्हणजेच ८,१७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांवर शनि ग्रहाचे राज्य असते. गुरू आणि शनि हे मैत्रीपूर्ण नसतात आणि त्यांचे स्वभाव खूप वेगळे असतात. परिणामी, या दोन्ही अंकांमध्ये चांगले संबंध निर्माण होत नाहीत. ३ अंक असलेले लोक निश्चिंत जीवन जगतात, तर ८ अंक असलेले लोक खूप प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि संघटित आयुष्य जगतात.

मूलांक ५ आणि ७

५ हा अंक असलेले म्हणजेच ५,१४,२३ या तारखेला जन्मलेले लोक. हे बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली असतात आणि या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारसरणीच्या असतात. त्यांना पैसे कमविण्याची आवडदेखील असते. दरम्यान ७ अंक म्हणजे ७,१६,२५ या तारखेला जन्मलेले लोक. हे लोक केतूच्या प्रभावामुळे अध्यात्माकडे अधिक कल दाखवतात. त्यांच्या विचारसरणीतील गहन फरक त्यांना एकमेकांशी जुळवून घेण्यास अडथळा आणतात.