Tulsi Vastu Tips for Home: हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. एवढेच नाही, तर ज्या घरात तुळशीचे रोप असते, त्या घरात नेहमी सुख-समृद्धी येते. तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मीमातेचा निवास असतो, असे म्हणतात. त्यामुळेच ज्या घरामध्ये तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केली जाते, त्या घरावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद कायम राहतो, असेही म्हणतात. तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहही कायम राहतो.

तुळशीला आपल्याकडे धार्मिक महत्त्व तर आहेच; पण तुळस सर्वाधिक प्राणवायू देणारी वनस्पती असल्याने तुळशीचे शास्त्रीयदृष्ट्याही बरेच महत्त्व आहे. तुळशीला धार्मिक आणि औषधी महत्त्व आहे. तुळस आरोग्यासाठी अनेक फायदे देते, जसे की सर्दी, खोकला, ताप आणि इतर अनेक रोगांवर उपचार करते. बहरलेली तुळस बघायला किती छान वाटते. तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, धनसंपत्तीची कधीच कमतरता भासू नये आणि घरात सकारात्मकता सातत्याने भरून राहावी, अशी इच्छा असेल, तर घरात तुळशीचे रोप लावण्याचे एक छोटे; पण अतिशय प्रभावी पाऊल उचलायला विसरू नका. आता तुळशीचे रोप लावायचे तुम्ही मनाशी निश्चित केले खरे; पण प्रश्न आहे ते नक्की कधी लावावे? कोणता दिवस त्यासाठी शुभ असतो? आणि हे रोप नेहमी टवटवीत, ताजे कसे ठेवावे? तर मग तेच आपण जाणून घेऊया…

हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. असे मानले जाते की, तुळशीमध्ये स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो आणि तिची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. त्यामुळेच प्रत्येक धार्मिक कार्यात तुळशीचा समावेश असतो. प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी शालिग्राम विष्णूसोबत तुळशीचा पवित्र विवाह विधी पार पाडला जातो. त्यामुळे जर तुम्ही तुळशीचे नवीन रोप लावण्याचा विचार करीत असाल, तर हा काळ त्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

तुळशी रोप कधी लावावे?

धार्मिक ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे, विशेषतः गुरुवार किंवा शुक्रवार हे दिवस तुळशी रोप लावण्यासाठी उत्तम मानले जातात. तसेच कार्तिक व चैत्र महिन्यात तुळस लावल्याने घरावर सातत्याने लक्ष्मीची कृपा राहते, असा जनमानसाला दृढ विश्वास आहे.

तुळस नेहमी हिरवीगार राहण्यासह तिच्या वाढीसाठी काय करावे?

  • ते दररोज किमान चार ते सहा तास सूर्यप्रकाशात ठेवावे.
  • उपजाऊ माती आणि गोबर खताचे मिश्रण वापरावे.
  • पाणी रोज घालावे; पण साचू देऊ नये.
  • तुळशीच्या रोपाची वेळोवेळी छाटणी करीत राहावी म्हणजे नवीन फांद्या फुटण्यास वाव मिळतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)