Sankashti Chaturthi September 2023: हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची परंपरा आहे. तसेच भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला हेरंब संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. या वर्षी ते व्रत ३ सप्टेंबर २०२३ रोजी पाळले जाणार आहे.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा आणि व्रत करण्याची पद्धत आहे. या दिवशी गणपतीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता मिळते आणि प्रत्येक प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. संकष्टी चतुर्थीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊ या. हेरंब संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या ३२ रूपांपैकी एक असलेल्या हेरंबाची पूजा करण्याची परंपरा आहे.

संकष्टी चतुर्थी २०२३ शुभ मुहूर्त –

भाद्रपद कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी २ सप्टेंबर रात्री ८ वाजून ४९ मिनिटांनी सुरु होणार असून ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी ती समाप्त होणार आहे.

गणपती पूजेची वेळ – ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांपासून १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत.

सायंकाळच्या पूजेची वेळ – ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.४१ ते रात्री ९.२१

चंद्रोदय वेळ – ३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ५७ मिनिटांनी.

हेही वाचा- दिवाळीपूर्वी शनिदेव ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभासह, व्यवसायात वाढ होण्याची शक्यता

संकष्टी चतुर्थी २०२३ पूजा विधी –

उद्याच्या म्हणजेच संकष्टी चतुर्थीला हेरंब किंवा भाद्रपद संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. या संकष्टीला सूर्योदयाच्या वेळी उठून व स्नान करुन नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करुन गणपतीची विधिवत पूजा केली जाते. तसेच दिवसभर उपवास देखील केला जातो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)