छत्रपती संभाजीनगर : वैजापूर, कन्नड तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीनंतरच्या पुरामध्ये वाहून गेलेल्या दोन बालकांचे मृतदेह सोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळी हाती लागले. पिशोर येथील अंजना नदीत सोमवारी दुपारी वाहून गेलेल्या मुलाचा मंगळवारी सायंकाळपर्यंतही शोध लागलेला नव्हता.

वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील कविटखेडा व अंचलगाव शिवारात दोन मुले पुराच्या पाण्यात सोमवारी दुपारी वाहून गेली होती. गौरव कृष्णा शिंदे (वय १४) व राज गुलाब ब्राह्मणी (वय ६), अशी मृत मुलांची नावे असल्याची माहिती शिवूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांनी दिली. वैजापूर तालुक्यातील कविटखेडा येथील गौरव शिंदे हा नववीत शिकणारा मुलगा लोणी-बोलठाण मार्गावरील नदीवरील पुलावरून वाहून गेला होता. घटना घडताच गावकऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्याचा मृतदेह आढळून येत नसल्याने छत्रपती संभाजीनगरमधील अग्निशमन विभागाच्या पथकाला पाचारण करावे लागले. मंगळवारी सकाळी गौरवचा मृतदेह हाती लागला. राज ब्राह्मणी हा सहा वर्षीय मुलगा अंचलगाव शिवारातीलच एका नाल्यात पडला होता. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनीच नाल्या उडी घेतली. परंतु राजचा बुडून मृत्यू झाला. राजचे कुटुंबीय मध्यप्रदेशातील लखनगाव सेंधवा येथून मजुरीसाठी आले होते.

कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना नदीत श्रावण मोकासे हा १० वर्षीय मुलगा वाहून गेला आहे. पिशोर येथील बाजार पट्टीला लागून असलेल्या अंजना नदीवर अमराई रस्त्यालगत असलेल्या पुलावरून श्रावण सोमवारी दुपारी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीला सतत पूर येत आहे. श्रावण मोकासेचा मंगळवारी रात्रीपर्यंत शोध लागला नव्हता. त्याचा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक व अग्निशमन विभागाचेही पथक शोध घेत असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाकडून मिळाली.