छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी २ सप्टेंबरच्या सकाळी सातच्या ठोक्याला प्रसूती कक्षात गेले होते. ते सतत चोवीस तास काम करत होते. न जेवता, क्षणभरही विश्रांती न घेता त्यांनी ७८ प्रसुती केल्या आणि ते जेव्हा प्रसुती कक्षाच्या बाहेर आले, तेव्हा ३ सप्टेंबरची सकाळ उजाडली होती. या २४ तासात कामाचा ताण एवढा होता की कोणालाही उसंत नव्हती. एक मूल जन्माला यायचे. सुखरुप बाळ-बाळंतीण कक्षाबाहेर पाठवायचे. यामध्येच सातत्याने झटणाऱ्या डाॅक्टर, कर्मचाऱ्यांचे ७८ प्रसूती केल्याच्या कामाचे कौतुक होत असले तरी त्यांच्या ताणाचा कोण विचार करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रसूतीनंतर कक्ष साफ करण्यासाठी केवळ आठ चतुर्थश्रेणी कर्मचारी काम करत होते. या कक्षाचे प्रमुख डाॅ. एस. एन. गडाप्पा म्हणाले, अक्षरश: कोणालाही जेवणाची सुटीही घेता आली नाही. ताण एवढा आहे की गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात खाटांशिवाय खाली गाद्या टाकून प्रसूत झालेल्या महिलांची काळजी घ्यावी लागते.

प्रसूत ७८ महिलांपैकी ६० टक्के गर्भवती या ग्रामीण भागातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल झालेल्या होत्या. हे रुग्णालय अतिगंभीर रुग्णांवर व गुंतागुंतीच्या प्रसूती करण्यासाठी असले तरी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका स्तरावरील ग्रामीण तथा उपकेंद्रात सरसकटपणे महिलांना पुढील उपचारासाठी जिल्हा स्तरावर पाठवले जाते. २ ते ३ सप्टेंबरच्या २४ तासात झालेल्या प्रसूतींपैकी ६१ नैसर्गिक तर १७ महिला शस्त्रक्रियेद्वारे (सिजेरियन) प्रसूत झाल्या. १५ अतिजोखमीच्या गर्भवतींचीही प्रसूती सुलभरीत्या पार पडल्या.

डाॅ. गडाप्पांच्या सहकारी डाॅक्टरांनी सांगितले की, गर्भवतींच्या पोटातील बाळाच्या हृदयाचे ठाेके तपासणे, रक्तदाबावर लक्ष ठेवणे, कळा लांबत असतील तर त्यांच्या आवश्यक त्या हालचाली करून घेणे, आदी कामे तर करावीच लागतात. शिवाय महिला प्रसूत झाल्यानंतर भोवतालची साफसफाई हा मोठा डोकेदुखीचा भाग असतो. केवळ आठ कर्मचाऱ्यांनी तो पार पाडला. यासाठी परिचारिका आणि सफाई कर्मचाऱ्यांना २४ तास जागे राहावे लागले. या सर्व प्रक्रियेमध्ये १२ डाॅक्टर, आठ कार्यालयीन परिचारिका यांचा समावेश होता. मोठ्या कष्टाने हे काम पार पाडल्यामुळे घाटी रुग्णालयातील वरिष्ठांकडून या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत असले तरी त्यांच्यावरील ताण मात्र, दिवसेंदिवस वाढत आहे.

दाेनशे खाटांच्या या कक्षात १२० प्रसूत महिलांना दाखल करता येते, याशिवाय अन्य स्त्री आजारातील महिलांचीही काळजी घ्यावी लागते. या कक्षाच्या भोवताली गर्दी एवढी असते की प्रत्येक महिलेला खाट मिळेल, याची खात्री कोणालाच देता येत नाही. काही जणींना खाटाशिवाय खाली गादी टाकून झोपवावे लागते, अधिकारीही मान्य करतात.

तोकडे मनुष्यबळ

साधारणपणे आठ तासाच्या सत्रामध्ये (शिफ्ट) १२ डाॅक्टर, ८ परिचारिका व ८ चतुर्थश्रेणी कर्मचारी एवढे मनुष्यबळ असते. प्रत्यक्षात ही संख्या आठ तासासाठी आवश्यक आहे. पण या कर्मचाऱ्यांमध्ये आम्ही २४ तास काम करतो. त्यामुळे आमची तारांबळ उडते. रुग्णांचेही हाल हाेतात. दोन सहयोगी प्राध्यापक, ७ सहायक प्राध्यापक, वर्ग-१ चे अधिकारी व इतर कर्मचारी अशी पदे रिक्त आहेत. – डाॅ. एस. एन. गडाप्पा, प्रसूती विभाग प्रमुख.