छत्रपती संभाजीनगर : बाबा पेट्रोल परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये बनावट नोटा तयार करून आणि जादूटोण्याच्या आधारे आर्थिक फसवणूक करण्याचा कट शिजत असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकला. ही कारवाई ११ जूनला सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेच्या सुमारास करण्यात आली असून, याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक काशिनाथ महांडुळे यांच्या तक्रारीवरून नरबळी, जादूटोणा कायद्यानुसार तिघांविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास प्रकाश उत्तरवार (४२, रा. खडकी बाजार ता. हिमायतनगर), विलास देवराव कुहिले (४२, रा. जुरूळ ता. वैजापूर) आणि शंकर बबनराव काजळे (३६, रा. चिकलठाणा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा, कोरे चेकबुक्स, जादूटोण्याचे साहित्य आणि लाखो रुपयांचे चेक जप्त करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, संबंधित हाॅटेलच्या ३१० आणि ३१४ क्रमांकाच्या खोल्यांमध्ये काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करत आहेत. काही लाखांचे धनादेश छाप्यामध्ये आढळून आलेत.