धाराशिव: पूर्व पत्नीची परवानगी न घेता किंवा तिला अधिकृत तलाक न देता, नवा संसार थाटणे शिक्षक पतीला चांगलेच भोवले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सेवा व वर्तणूक नियमावर बोट ठेवत दुसरे लग्न करणार्या शिक्षकाला आणि त्याच्याशी घरोबा करणार्या झेडपीच्या शिक्षिकेला निलंबित केले आहे. शिक्षण क्षेत्रातील या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात सध्या खळबळ माजली आहे. तुळजापूर तालुक्यातील रायखेल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शेख फिरोज इस्माईल हे सहशिक्षक आहेत. त्यांनी त्यांची पूर्वपत्नी हिना फिरोज शेख यांना न कळवता, त्यांची परवानगी न घेता किंवा त्यांना अधिकृत तलाक न देता जिल्हा परिषदेच्याच अन्य एका शिक्षिकेसोबत नवा संसार थाटला. हिना शेख यांनी तुळजापूरच्या गटशिक्षणाधिकार्यांकडे त्याबाबत तक्रार केली. तक्रारीत समीना गुलाब बागवान हिच्याशी माझ्या पतीने लग्न केले आहे. समीना बागवान ही कळंब तालुक्यातील माळकरंजा येथे सहशिक्षिका आहे. मात्र तडजोडपत्रानुसार अर्धा पगार मला देण्याचे पतीने मान्य केले होते. त्यांनी तडजोडीनुसार मला अर्धा पगार दिलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करून मला न्याय देण्यात यावा, अशी मागणी गटशिक्षणाधिकार्यांकडे केली होती. हेही वाचा : मुंडेंच्या नाथ्रा गावात गोळीबार; पोलीस अधीक्षकांची भेट हिना शेख यांच्या तक्रारीवरून पहिल्या पत्नीची परवानगी न घेता नवा घरोबा करणार्या शिक्षक फेरोज शेख यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार त्यांनी गटशिक्षणाधिकार्यांकडे सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सेवा व वर्तणूक नियमांचा भंग केला असल्याचा ठपका ठेवत प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर निलंबन कालावधीत फेरोज शेख यांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेशही बजावण्यात आले आहेत. हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : रेल्वेच्या धक्क्यात कुत्र्यासह वकिलाचा मृत्यू शिक्षिकेचेही तडकाफडकी निलंबन विवाहित शिक्षक फिरोज शेख यांच्याशी दुसरा विवाह करणार्या सहशिक्षिका समीना बागवान यांना देखील जिल्हा परिषदेने सेवेतून निलंबित केले आहे. त्यांच्यावर देखील सेवा वर्तणूक नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत १ ऑगस्टपासून जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित केले जात असल्याचा आदेश बजावण्यात आला आहे. या कालावधीत भूम गटशिक्षण कार्यालयातील रिक्त पदावर समीना बागवान यांना ठेवण्यात आले आहे. तर शिक्षक फिरोज शेख यांची परंडा येथील गटशिक्षण कार्यालयात रिक्त पदावर ठेवण्यात आले आहे.