छत्रपती संभाजीनगर : शेततळ्यात बुडून परराज्यातील वडील-मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोयगाव तालुक्यात पळसखेडा शिवारात असलेल्या एका शेतात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. विनोद रमेश डुडवे (वय ३५) व मनोज विनोद डुडवे (वय ७), अशी मृत वडील-मुलाची नावे असून, या घटनेत एका मुलाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिली.
डुडवे कुटुंब हे बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील ढोलकोट (ता. नेपानगर) येथील मूळचे रहिवासी असून, पळसखेडा शिवारातील शेतकरी मनोज रामसिंग शेवगण यांच्या शेतात मोलमजुरीचे काम करत होते. शेवगण यांच्या गट. नं. २३० मध्ये असलेल्या शेततळ्यात रविवारी दुपारी विनोद डुडवे हे उतरले होते. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही होती. मात्र, विनोद डुडवे बुडू लागले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मनोजही बुडाला.
यावेळी विनोद डुडवे यांच्या पत्नीने नजीकच्या नागरिकांना मदतीसाठी ओरडून आवाज दिले. मात्र, मदत मिळपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. तर एका मुलाला वाचवण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदन सोयगावच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आले.